(राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर यांची संयुक्त घोषणा पत्रकार परिषदेत,मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज येथे महत्त्वपूर्ण निर्णय)
चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील राजकीय वातावरणात नव्या समीकरणांनी हलचल निर्माण केली आहे. चंदगड नगरपंचायत व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी - म्हणजेच अजित पवार गट आणि शरदचंद्र पवार गटाने -एकत्र येऊन भाजपविरोधात लढण्याची घोषणा केली आहे.
हा ऐतिहासिक निर्णय माजी आमदार राजेश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) आणि नंदाताई बाभुळकर (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट) यांनी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला.
यावेळी बोलताना माजी आमदार राजेश पाटील म्हणाले,“विधानसभा निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो आणि त्याचा परिणाम म्हणून पराभव पत्करावा लागला. पण आता आम्ही एकत्र आलो आहोत. आगामी चंदगड नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा आपली सत्ता प्रस्थापित करू.”
त्याचप्रमाणे नंदाताई बाभुळकर यांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढा देण्याचे आवाहन केले.पत्रकार परिषदेला दोन्ही गटांचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.या एकतेमुळे चंदगड तालुक्याच्या निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून, स्थानिक पातळीवरील राजकारणात या घोषणेने नवा कलाटणीबिंदू निर्माण केला आहे.


Post a Comment
0 Comments