Type Here to Get Search Results !

चंदगड तहसील कार्यालयातील स्वच्छतागृह अत्यंत अस्वच्छ-नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

 


सामाजिक कार्यकर्ते ऍड.संतोष मळवीकर यांचा इशारा-‘सोमवारपर्यंत स्वच्छता न झाल्यास तहसील कार्यालयाला कुलूप’


सोशल मीडियावरून आंदोलनाची चेतावणी-सर्वसामान्य नागरिकांचा मोठा पाठिंबा


चंदगड : चंदगड तालुक्यात स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवले जात असताना, तहसील कार्यालयातील स्वच्छतागृह मात्र भीषण अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने याविरोधात तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व आंदोलनकर्ते ऍड.संतोष मळवीकर यांनी तीव्र भूमिका घेतली आहे.



ऍड.मळवीकर यांनी सोशल मीडियाद्वारे चेतावणी दिली आहे की, सोमवारपर्यंत तहसील कार्यालयातील स्वच्छतागृह स्वच्छ केले नाही तर थेट तहसील कार्यालयालाच कुलूप लावण्यात येईल. त्यांच्या या इशाऱ्याने तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे.तहसील कार्यालय हे चंदगड तालुक्यातील सर्व महत्त्वाच्या कागदपत्रे, दाखले व प्रशासकीय कामांसाठी नागरिकांची प्रमुख शासकीय धाव आहे. अशा ठिकाणी अस्वच्छ, वापरण्यायोग्य नसलेले स्वच्छतागृह नागरिकांना तीव्र मनस्ताप देत आहे. महिलांसह सर्वसामान्य नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, ‘तक्रार कुणाकडे करायची?’ या प्रश्नाने अनेकजण दडपून राहत होते.


अशा परिस्थितीत ऍड.संतोष मळवीकर यांनी पुढाकार घेत हा प्रश्न उचलल्याने नागरिकांकडून त्यांच्या निर्णयाचे भरभरून स्वागत केले जात आहे.

“स्वच्छतेची भाषा करणाऱ्या प्रशासनाने स्वतःच्या कार्यालयातील मूलभूत सुविधा नीट ठेवाव्यात” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे.


सोमवार हा अंतिम दिवस असल्याने तहसील प्रशासन काय भूमिका घेते व नागरिकांच्या या मूलभूत मागणीची दखल घेतली जाते का? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments