(भूकंप, आग, पूर, अपघात अशा संकटांवेळी शांती, सजगता व तत्पर कृतीचे महत्त्व स्पष्ट,शाळास्तरीय प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता व तत्पर प्रतिसाद देण्याची सवय विकसित)
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे सजग नागरिकत्व-रामपूर विद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम
रामपूर (ता. चंदगड) : “आपत्ती कधी येईल हे सांगता येत नाही; पण तिचा सामना करण्याची तयारी असणे हेच खरे आपत्ती व्यवस्थापन होय. योग्य वेळेवर त्वरित प्रतिसाद दिल्यास मोठ्या हानीपासून बचाव करता येतो,” असे प्रतिपादन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे रेस्क्यू टीमचे सदस्य रोशन कुंभार यांनी केले.ते बागिलगे रामपूर विद्यालय, रामपूर (ता. चंदगड) येथे आयोजित आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.
यावेळी त्यांनी भूकंप, आगीची घटना, पूरस्थिती, रस्ता अपघात अशा विविध प्रसंगांमध्ये कसे शांत राहावे, मदत कशी मागवावी, आणि स्वतःसह इतरांचे प्राण कसे वाचवावेत याबाबत प्रत्यक्ष दाखले देत मार्गदर्शन केले. “शाळा ही आपत्तीच्या वेळी प्राथमिक प्रतिसाद देणाऱ्या तरुण नागरिकांची पहिली शाळा आहे. विद्यार्थ्यांनी केवळ माहिती घेऊ नये, तर ती प्रत्यक्ष वापरात आणावी,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक टी. व्ही. पाटील होते. त्यांनी या प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “आपत्ती व्यवस्थापन ही केवळ सरकारी जबाबदारी नसून प्रत्येक विद्यार्थ्याने, शिक्षकाने व नागरिकाने आपली भूमिका ओळखून सज्ज राहणे आवश्यक आहे.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. एन. शिवणगेकर यांनी केले, तर सुत्रसंचालन राजेंद्र शिवणगेकर यांनी उत्साहपूर्ण पद्धतीने केले.याप्रसंगी शिक्षक ए. बी. नाईकवाडी, व्ही. डी. पाटील, एस. व्ही. यादव व एस. के. बेनके उपस्थित होते. आभार पी एस मगदूम यांनी मानलेशेवटी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सरावाच्या माध्यमातून प्राथमिक उपचार, सुरक्षित स्थलांतर, व बचाव प्रक्रियेचा अनुभव घेतला.
शाळास्तरीय या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती काळात शांतता, धैर्य आणि तत्परता राखण्याची वृत्ती विकसित झाली असून समाजात सजग नागरिक घडवण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.


Post a Comment
0 Comments