‘जाती तोडो – समाज जोडो’ अभियान प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार
चंदगड (प्रतिनिधी) : बहुजन क्रांती सामाजिक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक चंदगड येथे अत्यंत उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटना मजबूत करणे, मतदारांमध्ये जागृती निर्माण करणे, राष्ट्राभिमान व देशाभिमान जागृत करणे, लोकशाही मूल्ये बळकट करणे आणि संघटना वाढीसाठी ठोस उपक्रम राबवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, व प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. गुंडुराव कांबळे होते, तर प्रास्ताविक कार्याध्यक्ष भिकाजीराव भोगोलिकर यांनी करून संघटनेचे उद्दिष्टे आणि आगामी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहुजन संघटक पी. डी. सरवदे यांनी प्रभावीपणे केले.बैठकीत ज्येष्ठ शाहीर मधुकर कांबळे यांनी आपल्या प्रभावी शैलीत कार्यकर्त्यांना प्रेरित केले. त्यांनी भाषणात म्हटले की,
“बंधूंनो, आपण आज एका नव्या सामाजिक परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जातींच्या भिंती मोडून समाज जोडणे हीच खरी क्रांती आहे.
आपल्या पूर्वजांनी अन्यायाच्या अंधारात मानवतेचा दीप प्रज्वलित केला; आज त्या दीपाला तेज देणे ही आपली जबाबदारी आहे.
‘जाती तोडो – समाज जोडो’ हे फक्त घोषवाक्य नसून आपल्या अस्तित्वाचा श्वास आहे.
शिक्षण, संघटन आणि संघर्ष या तिन्ही मार्गांनी समाज परिवर्तन साध्य करूया.”
शाहीर कांबळे यांच्या प्रभावी भाषणाने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. गुंडुराव कांबळे म्हणाले की,
“बहुजन क्रांती सामाजिक संघटना ही व्यक्तीवर्चस्वासाठी नव्हे, तर विचारवर्चस्वासाठी कार्य करते.
आपले ध्येय संविधानाच्या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करणे आहे.
मतदारांमध्ये विचारजागृती निर्माण झाली पाहिजे; कारण विचार करणारा मतदारच लोकशाही मजबूत करू शकतो.
प्रत्येक सदस्याने ‘जागृतीचा सैनिक’ बनून गावागावात संघटनेचा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करावा.
जातीभेदाचे बंधन तोडून सामाजिक एकता प्रस्थापित केल्यासच खरी लोकशाही रुजेल.”
त्यांच्या विचारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना नवी दिशा व प्रेरणा मिळाली.
या बैठकीत पांडुरंग कांबळे, शिवाजी कांबळे, सरपंच आनंद कांबळे, सरपंच एकनाथ पाटील, बबन माने,राजू कांबळे,अजित शेरशेट्टी,संदीप यादव, लखन कांबळे, सरपंच राजेंद्र कांबळे, चंद्रकांत कांबळे, विठ्ठल कांबळे, आणि पत्रकार संदीप कांबळे, दीपक माने यांनी चर्चेत सहभाग घेतला.संघटनेच्या वाढीसाठी नियोजनबद्ध व शिस्तबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचा ठराव करण्यात आला.कार्यक्रमाचे आभार दीपक अडकुरकर यांनी मानले.बैठकीस चंदगड तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांची उस्फूर्त उपस्थिती लाभली.एकतेचा, संविधान निष्ठेचा आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारी ही बैठक ऐतिहासिक ठरली.

Post a Comment
0 Comments