२५० जीव गेले, तरीही केवळ नावालाच खड्डे बुजवणे? प्रवासी आणि स्थानिकांमध्ये संतापाची लाट.
कामात ढिलाई चालूच राहिली तर आंदोलनाचा इशारा — स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राध्यापक दीपक पाटील यांचा इशारा.
बेळगाव–वेगुर्ला मुख्य मार्गावरील शिनोळी परिसरात रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांचे फक्त दिखाऊ पद्धतीने काम सुरू असल्याचा गंभीर आरोप प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे. ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘मिलीभगत’मुळे खड्डे बिनदुरुस्तीच्या घाईगडबडीत भरले जात असून डांबर मारण्याआधीच खड्डे बुजवण्याची ढिसाळ प्रक्रिया लोकांच्या रोषाचे कारण ठरत आहे.गेल्या काही वर्षांत याच रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात झाले आणि सुमारे २५० जणांचा जीव गेला, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
काही दिवसांपूर्वी शिनोळीत माडेदुर्ग येथील एका महिलेला याच खड्ड्यामुळे जीव गमवावा लागला. फक्त नावालाच खड्डे बुजवण्याचे काम सुरू असल्याने लोकांत तीव्र नाराजी पसरली आहे.प्रवासी वर्गातून असे स्पष्टपणे सांगितले जात आहे की, “हे काम म्हणजे फक्त डोळ्यात धूळफेक!”
एकाच खड्ड्याबाबत अनेक वेळा आंदोलन झाले, निवेदने दिली, तरीही रस्त्याची स्थिती जसची तशीच.
स्थानिकांचा सवाल — “आणखी किती लोकांचा बळी गेल्यावर हा रस्ता नीट होणार?”
कामाचा दर्जा सुधारला नाही, ढिसाळ काम सुरूच राहिले, तर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, असा कडक इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा. दीपक पाटील, संघर्ष प्रज्ञावंत यांनी दिला आहे.त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दोषी ठरवत, तातडीने योग्य दर्जाचे, टिकाऊ आणि सुरक्षित काम करण्याची मागणी केली आहे.बेळगाव–वेगुर्ला रोड हा दररोज हजारो प्रवाशांचा प्रमुख प्रवासमार्ग असताना, अशा निकृष्ट कामामुळे वाढणारा जीवितहानीचा धोका पुन्हा एकदा उघड झाला आहे.


Post a Comment
0 Comments