(कोल्हापूर जिल्ह्यासह चंदगड तालुक्यातील नागरिकांची मागणी)
मुंबई/प्रतिनिधी : कोल्हापूर–आजरा–गडहिंग्लज–चंदगड मार्गे बेळगाव हा नवा रेल्वेमार्ग त्वरीत सुरू करावा, अशी जोरदार मागणी कोल्हापूर जिल्हा व चंदगड तालुक्यातील प्रवासी व नागरिकांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी, उत्तूर, गडहिंग्लज, आजरा, नेसरी, चंदगड तसेच बेळगाव परिसरातील लोकांना सध्या प्रवासासाठी बस व खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. महामार्गावरची टोल व इंधनावरील वाढती दरवाढ, प्रवासाचा जास्त वेळ आणि वाढती खर्चिकता यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. नवा रेल्वेमार्ग सुरू झाल्यास या भागातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर तसेच स्थानिक आमदार शिवाजी पाटील यांनीही हा मुद्दा सकारात्मक भूमिकेतून पाठपुरावा करण्याची भूमिका घेतली आहे, अशी माहिती प्रवासी संघाचे अध्यक्ष ऍड.चंद्रकांत निकम यांनी दिली.
स्वातंत्र्यानंतर भारतीय रेल्वेने देशातील इतर भागात अनेक नवे मार्ग उभारले असताना कोल्हापूर जिल्ह्यात एकही किलोमीटर नवा रेल्वेमार्ग झाला नाही. 1970–72 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानंतरही आजवर कोणतीही प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याचे नागरिकांचे मत आहे.
या मार्गाचा फायदा चंदगड तालुका, आजरा–गडहिंग्लज परिसर, तसेच बेळगाव–कोल्हापूर या औद्योगिक व व्यावसायिक विभागांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याने हा प्रकल्प तातडीने राबवावा, अशी मागणी प्रवासी संघटना व नागरिकांनी एकमुखाने केली आहे.

Post a Comment
0 Comments