Type Here to Get Search Results !

मुगळीतील विद्यार्थ्याची हृदयशस्त्रक्रिया शासन योजनेतून पूर्णपणे मोफत!


राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून तब्बल ₹2.50 लाखांचा उपचार विनामूल्य,पालकांसाठी संदेश – प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करून घ्या!


चंदगड/प्रतिनिधी : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम चंदगड अंतर्गत विद्यामंदिर मुगळी शाळेतील इयत्ता तिसरीचा विद्यार्थी संतोष धोंडीबा पाटील याच्या शालेय आरोग्य तपासणीत हृदयविकाराचे निदान झाले.तपासणी डॉ. योगेश पोवार व डॉ. स्नेहल पाटील यांनी केली. त्यानंतर बारदेसकर हॉस्पिटल, गडहिंग्लज येथे 2D एको तपासणीत VSD (Ventricular Septal Defect) असल्याचे स्पष्ट झाले.


घरची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने कुटुंबीय शस्त्रक्रियेस तयार नव्हते. परंतु राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ही संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत केली जाईल असा विश्वास डॉ. पोवार, डॉ. पाटील व बारदेसकर सर यांनी दिला.शेवटी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी गडहिंग्लज येथील बारदेसकर हॉस्पिटलमध्ये तब्बल ₹2.50 लाख खर्चाची हृदयशस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्याने मुलाच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला.


या कार्यात ग्रामीण रुग्णालय चंदगडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मकानदार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमजाळ, परिचारिका सावंतकर, डॉ. स्नेहल पाटील, फार्मासिस्ट रुचिता बांदेकर व सहाय्यक अनिल नांदवडेकर यांचे मोलाचे योगदान लाभले.ऑपरेशननंतर पेशंटला भेट देताना पालकांचे अश्रू अनावर झाले. त्यांनी डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार मानले.


राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. तपासणीत आढळणारे आजार शासनाच्या विविध योजनांतून पूर्णपणे मोफत उपचारयोग्य आहेत.त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या मुलांची शालेय आरोग्य तपासणी नियमित करून घ्यावी, अशी आवाहनात्मक विनंती राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम चंदगड तर्फे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments