आयुष्मान आरोग्य मंदिर नागनवाडी येथे यशस्वी नॉर्मल डिलीव्हरी – सर्व सेवा पूर्णपणे मोफत!
(गरिबांसाठी वरदान ठरलेले उपकेंद्र – आई व बालकाची सुरक्षित प्रसूती, डिलीव्हरी किटचे वितरण, डॉ. ऋतुजा पोवार यांच्या नेतृत्वाखाली स्टाफची तत्पर सेवा-रुग्ण व नातेवाईकांकडून मनःपूर्वक आभार)
चंदगड/प्रतिनिधी - आजच्या वाढत्या महागाईच्या काळात जेथे उपचार आणि प्रसूती खर्च सर्वसामान्यांसाठी आव्हान बनले आहे, तेथे “आयुष्मान आरोग्य मंदिर नागनवाडी” या.चंदगड हे केंद्र गोरगरिबांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे.गुरुवार दिनांक ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ३ वाजून ११ मिनिटांनी या केंद्रात एका गरोदर मातेला यशस्वी नॉर्मल डिलीव्हरी करण्यात आली. बुधवारी सायंकाळी दाखल झालेल्या त्या रुग्णास आवश्यक उपचार, तपासण्या व प्रसूतीसाठीची संपूर्ण तयारी अत्यंत दक्षतेने करण्यात आली.
या डिलीव्हरीसाठी उपकेंद्रातील डॉ. ऋतुजा पोवार (समुदाय आरोग्य अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली सिस्टर सोनाली गुरले, कर्णाची सिस्टर (परिचारिका), आशा सेविका व एम्बुलन्स ड्रायव्हर धेंडे मामा उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे जबाबदारीने काम पार पाडत सुरक्षित प्रसूती घडवून आणली.प्रसूतीनंतर आई व बाळ दोघेही सुरक्षित असून त्यांना “डिलीव्हरी किट” देण्यात आले. यासोबत तपासणी, औषधोपचार आणि सर्व सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या.
या यशस्वी आरोग्य सेवेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कानूर खुर्दचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.डिलीव्हरीनंतर माता व त्यांच्या नातेवाईकांनी स्टाफचे मनापासून आभार मानले. त्यांनी सांगितले की, “आजच्या काळात एवढ्या प्रेमाने व विनामूल्य सेवा देणारे केंद्र म्हणजे खऱ्या अर्थाने आरोग्याचे मंदिर आहे.”
या घटनेमुळे परिसरातील इतर महिलांमध्येही आरोग्यसेवेबद्दल विश्वास वाढला असून, ‘गरिबांच्या हाती आरोग्याचा हक्क’ हे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे.


Post a Comment
0 Comments