तुल्यबळ उमेदवारांना पराभूत करण्यासाठी काळी जादू वापरल्याची चर्चा; काहीजण भटजीकडे जाऊन ‘व्यवस्था’ केल्याचेही समजते,अशा अनिष्ट, बेकायदेशीर व अंधश्रद्धापूर्ण प्रथा थांबवाव्यात; निवडणूक ही लोकशाहीची प्रक्रिया असून जादूटोण्याने नाही तर मतांनीच विजय ठरतो.
चंदगड/प्रतिनिधी – चंदगड नगरपंचायत निवडणुकीची धामधूम शिगेला पोहोचली असताना काही वार्डांत अंधश्रद्धा आणि अनिष्ठ प्रथांचा काहिली करणारा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी किंवा तुल्यबळ उमेदवाराला पाडण्यासाठी उतारा, झाडफूक किंवा काळी जादू अशा प्रथा केल्या जात असल्याची चर्चा परिसरात जोरात आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही उमेदवार किंवा त्यांचे समर्थक यांच्याकडून रात्रीच्या वेळेस संशयास्पद कृत्ये, विशिष्ट वस्तूंची अर्पणे, वाटांवर टाकलेले साहित्य, तसेच ‘कोणीतरी भटजीकडे जाऊन सर्व व्यवस्था करून आल्याचे’ बोलले जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेत अशा अंधश्रद्धापूर्ण प्रथांना स्थान नाही, असे मत सर्व स्तरांतील जाणकार व्यक्त करत आहेत.जर उतारा, झाडफूक किंवा काळ्या जादूने निवडणूक जिंकता आली असती, तर एकाही उमेदवाराला प्रचाराची, विकासाच्या वचनांची किंवा जनतेच्या दरबारी फिरण्याची गरजच भासली नसती! पण वास्तवात निवडणूक केवळ मतांच्या बळावरच निर्णित होते – हा मूलभूत लोकशाही सिद्धांत स्पष्ट आहे.
अशा प्रकारच्या कृत्यांना सामाजिकदृष्ट्या विरोध होणे आवश्यक असून निवडणूक आयोग, प्रशासन व पोलिसांनी यावर कठोर लक्ष ठेवावे, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे.मतदारांनीही अशा अफवा व अंधश्रद्धांना बळी न पडता आपल्या बुद्धीने, विकासकार्यांच्या आधारे आणि पात्रतेनुसार मतदान करावे, असे आवाहन सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.चंदगडमध्ये निवडणुकीचे वातावरण आता आणखी तापण्याची चिन्हे दिसत असली, तरी अंधश्रद्धेपेक्षा सत्य, विकास आणि लोकशाही मूल्यांवर आधारित निवडणूक व्हावी ही सर्वांचीच अपेक्षा आहे.

Post a Comment
0 Comments