(१६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार,५ फेब्रुवारी मतदान, ७ फेब्रुवारी मतमोजणी होणार)
राजेंद्र शिवणगेकर/ चंदगड : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर होणार असून, त्यानंतर ग्रामीण राजकारणाला वेग येणार आहे. या निवडणुकीकडे आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे म्हणून पाहिले जाणार असून, सर्व प्रमुख राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावणार आहेत.निवडणूक कार्यक्रमानुसार १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असून, २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. २७ जानेवारी हा अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असणार असल्याने त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी स्पष्ट होणार आणि प्रत्यक्ष प्रचाराला वेग येणार आहे.
या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाई, शेती व शेतकरी प्रश्न, रस्ते व वीजपुरवठा, आरोग्य व शिक्षण सुविधा, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे प्रमुख प्रचाराचे मुद्दे ठरणार आहेत. स्थानिक नेतृत्व, गटबाजी आणि पक्षांतर्गत समीकरणेही निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतदारांचा कल कोणत्या बाजूने झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांकडून सभा, मेळावे, प्रचारफेऱ्या आणि आरोप-प्रत्यारोप यांना उधाण येणार आहे.
७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील सत्तासमीकरण स्पष्ट होणार आहे. या निकालातून ग्रामीण भागातील राजकीय ताकद कोणाकडे आहे, हे समोर येणार असून त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटणार आहेत.दरम्यान, निवडणूक कार्यक्रम लागू होताच आचारसंहिता अंमलात येणार असून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सज्ज राहणार आहे.

Post a Comment
0 Comments