राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : चंदगड येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कोवाड येथे लीड कॉलेज अंतर्गत ‘सेंद्रिय शेती आणि त्याचे फायदे–तोटे’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बदलत्या जीवनशैलीत आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी सेंद्रिय शेतीचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून मा. एस. डी. खुटवड (तालुका उपकृषी अधिकारी, महाराष्ट्र शासन) यांनी मार्गदर्शन केले. तर प्रा. चेतन कणसे हे दुसरे प्रमुख वक्ते होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष एम. व्ही. पाटील होते. प्रमुख उपस्थितीत सचिव शाहू फर्नांडिस आणि प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांचा समावेश होता.
‘सेंद्रिय शेती’ या विषयावर बोलताना मा. एस. डी. खुटवड म्हणाले की,“प्राचीन काळात मानवी जीवन निसर्गाशी एकरूप होते. आहार, विहार आणि शेती ही पूर्णतः सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीवर आधारित असल्याने लोकांचे आरोग्य सुदृढ होते. मात्र, अलीकडच्या काळात रासायनिक खतांच्या अति वापरामुळे शेतीबरोबरच मानवी आरोग्यही धोक्यात आले आहे. आज विज्ञान प्रगत असले तरी पारंपरिक सेंद्रिय शेतीच आरोग्यदायी जीवनाचा पाया आहे. त्यामुळे समाज सुदृढ ठेवायचा असेल तर सेंद्रिय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे.”
यावेळी त्यांनी सेंद्रिय शेती करताना घ्यावयाची काळजी, सेंद्रिय खत निर्मितीची पद्धत, तसेच शेतीतील दीर्घकालीन फायदे यांची सविस्तर माहिती पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे दिली.दुसरे प्रमुख वक्ते प्रा. चेतन कणसे यांनी ‘जैविक खते व त्यांची ओळख’ या विषयावर सखोल विश्लेषण मांडत जैविक खतांचा योग्य वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात एम. व्ही. पाटील यांनी सेंद्रिय शेती ही भविष्यातील सुरक्षित शेती असल्याचे सांगितले. तर सचिव शाहू फर्नांडिस यांनी सेंद्रिय शेतीचे सामाजिक व आर्थिक महत्त्व विशद केले.कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी करत कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला.कार्यशाळेच्या प्रारंभी प्रमुख वक्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.महाविद्यालयातील प्रा. एस. जे. पाटील हे प्रथम सत्राचे अध्यक्ष, तर डॉ. ए. एस. आरबोळे हे द्वितीय सत्राचे अध्यक्ष होते. प्रमाणपत्र वितरण सत्रात प्रा. एस. जे. पाटील, डॉ. ए. के. कांबळे, डॉ. ए. एस. आरबोळे, डॉ. व्ही. के. दळवी, डॉ. के. पी. वाघमारे उपस्थित होते.
कार्यशाळेत हलकर्णी, चंदगड, आजरा, गडहिंग्लज येथील महाविद्यालयांमधील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सूत्रसंचालन डॉ. मोहन घोळसे व डॉ. सुनीता कांबळे यांनी केले, तर आभार प्रा.चैताली जाधव कणसे यांनी मानले.सेंद्रिय शेतीविषयी जागृती निर्माण करणारी ही कार्यशाळा विद्यार्थी, शिक्षक व समाजासाठी मार्गदर्शक ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment
0 Comments