ज्येष्ठांच्या सन्मान, सुरक्षितता व हक्कांसाठी आवाज
राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : समाजाचा कणा असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या विविध स्थानिक व राज्यस्तरीय प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चंदगड तालुका ज्येष्ठ नागरिक जिव्हाळा सेवा समितीच्या वतीने तहसीलदार राजेश चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनातून ज्येष्ठ महिला व पुरुषांच्या जीवनाशी निगडित मूलभूत, सामाजिक व सुरक्षिततेच्या मागण्या मांडण्यात आल्या.
यावेळी ज्येष्ठांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधताना तहसीलदार राजेश चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. समाजातील ज्येष्ठांच्या अनुभवाचा व योगदानाचा सन्मान राखणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.निवेदनामध्ये ६० वर्षे पूर्ण झालेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ₹५,००० सन्मान अनुदान, मोफत व दर्जेदार औषधोपचार सुविधा, सरसकट एसटी प्रवास सवलत, तसेच ज्येष्ठ नागरिक कल्याण व संरक्षण अधिनियम २००९ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच, ज्येष्ठ नागरिकांवर होणारा सामाजिक छळ व दुर्लक्ष थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना, प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘भरोसा केंद्र’ उभारणे, ग्रामपंचायत व नगरपंचायत हद्दीत ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रांची निर्मिती, तसेच ज्येष्ठांचे न्यायालयीन खटले त्यांच्या हयातीतच निकाली काढण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी, अशा भावनिक व अत्यंत महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या.या निवेदनावर सुभाष मातोंडकर, रामचंद्र पवार, बाबुराव पाटील, मारुती लाड, बंडोपंत पाटील, शरद पाटील, परशुराम सुतार, सौ. लतिका सुरूतकर, सोमनाथ गवस, तुकावाडी माडवळे, सुपे, जंगम, हट्टी, कार्वे, हलकर्णी, कार्वे व परिसरातील ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिकांच्या सह्या आहेत.
यावेळी ज्येष्ठांनी भावना व्यक्त करताना सांगितले की,
“आयुष्यभर कुटुंब, समाज व देशासाठी योगदान दिल्यानंतरही वृद्धापकाळात असुरक्षितता, आजारपण आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृती करून ज्येष्ठांचा सन्मान जपावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ही मागणी केवळ सुविधा नव्हे, तर ज्येष्ठांच्या सन्मान, सुरक्षितता व मानवी हक्कांसाठीचा संघर्ष असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments