(चंदगडच्या माडखोलकर महाविद्यालयात 'पर्यावरण व भूगोल' पोस्टर प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद; कोल्हापूरच्या भौगोलिक वैविध्याचे दर्शन)
चंदगड : चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र आणि पर्यावरण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष पोस्टर प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. 'पर्यावरण रक्षणासाठी माझे व्यक्तिगत योगदान' या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनातून जीव, जल, जमीन आणि ऊर्जा संवर्धन या विषयांचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात आले. निसर्ग संवर्धनाची ही चळवळ केवळ अभ्यासापुरती मर्यादित न राहता ती विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावी, व आपले घर हरितगृह घर कसे करावे असा मुख्य उद्देश या उपक्रमामागे होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी तरुण पिढीची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले. भूगोल विभाग प्रमुख डॉ. एन. एस. मासाळ यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रास्ताविकात डॉ. मासाळ यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, पर्यावरणासोबतच विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेची सविस्तर माहिती व्हावी, यासाठी विशेष परिश्रम घेण्यात आले आहेत.
या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याची प्राकृतिक रचना मांडणारे पोस्टर्स. यामध्ये जिल्ह्याचे स्थान, भूपृष्ठरचना, मृदेचे विविध प्रकार, नदी प्रणाली, जंगलांचे प्रकार आणि पर्जन्याचे वितरण यावर आधारित अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती मांडण्यात आली होती. या माहितीमुळे विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्याच्या साधनसंपत्तीची आणि भौगोलिक वैशिष्ट्यांची परिपूर्ण ओळख झाली. केवळ पुस्तकी ज्ञान न देता दृश्यात्मक माध्यमातून विषय मांडल्याने विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचे भरभरून कौतुक केले.या पोस्टर प्रदेशाला हलकर्णी महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्राध्यापक एस. बी तावदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला डॉ. एस. एन. पाटील, डॉ. जी. वाय. कांबळे, प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, प्रा. आर. एस. पाटील, डॉ. आर. के. सूर्यवंशी, डॉ. एस. डी. गावडे, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. आर. के. तेलगोटे, डॉ. के. एन. निकम, डॉ. बी. एम. पाटील आणि श्रीनिवास पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय शिस्तबद्ध आणि माहितीपूर्ण पद्धतीने पार पडलेल्या या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची नवी जाणीव निर्माण केली आहे.

Post a Comment
0 Comments