राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : मजरे कार्वे येथील व्ही. के. चव्हाण-पाटील कॉलेज मध्ये ‘जागतिक भूगोल दिन’ अत्यंत उत्साहपूर्ण आणि शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भौगोलिक जाणीव, पर्यावरण संवर्धनाचे भान आणि जागतिक घडामोडींचे आकलन वाढवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. यु. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. के. बी. कलजी यांनी प्रास्ताविक करताना भूगोल दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. भूगोल हा केवळ नकाशांचा विषय नसून तो मानवी जीवन, पर्यावरण, हवामान आणि शाश्वत विकासाशी थेट जोडलेला आहे, असे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी भूगोल विषयाचे प्राध्यापक प्रा. प्रदीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना बदलत्या हवामानाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास आणि पर्यावरण रक्षणाची गरज यावर सविस्तर मार्गदर्शन केले. आजच्या काळात भूगोल विषयाचे महत्त्व अधिक वाढले असून, पर्यावरणीय संकटे, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती समजून घेण्यासाठी भूगोलाचे ज्ञान अत्यावश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.भूगोल दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरणाबाबतची जबाबदारी आणि जागतिक नागरिकत्वाची भावना निर्माण होते. तसेच भूगोल विषयामुळे संशोधन, नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, हवामान अभ्यास अशा विविध क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध होतात, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे अत्यंत नेटके सूत्रसंचालन प्रा. अजय दळवी यांनी केले, तर शेवटी प्रा. अनिल कुट्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमास डॉ. यु. डी. पाटील, प्रा. अजय दळवी, प्रा. के. बी. कलजी, प्रा. प्रदीप कांबळे, प्रा. अनिल कुट्रे, तसेच कार्यालयीन अधीक्षक युवराज पाटील, संदीप पाटील (बसर्गे), संदीप पाटील (गुडेवाडी), दयानंद ओऊळकर आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाची आवड वाढली असून, भूगोल दिनाचे शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणीय महत्त्व अधिक ठळकपणे समोर आले आहे. सर्व स्तरांतून या कार्यक्रमाचे कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments