चंदगड/प्रतिनिधी : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्यानुसार चंदगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे.याबाबत चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
तहसीलदार चव्हाण यांनी सांगितले की, मतदार यादीचा आधार दिनांक १ जुलै २०२५ ग्राह्य धरून ही निवडणूक पार पडणार आहे. १६ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जातील. १८ जानेवारी (रविवार) सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी नामनिर्देशन प्रक्रिया होणार नाही. २२ जानेवारी २०२६ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून, २३, २४ व २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. २७ जानेवारी रोजी दुपारी ३.३० नंतर अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.
५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी होईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत.
चंदगड तालुक्यात एकूण १,५३,१४८ मतदार असून, त्यामध्ये ७७,३५७ पुरुष व ७५,७९१ महिला मतदार आहेत. मतदानासाठी २११ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, १६ झोनल अधिकारी नेमण्यात आले आहेत. निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी होसूर, शिनोळी, चेन्नेहट्टी व तिलारीनगर येथे तपासणी नाके (चेक पोस्ट) उभारण्यात येणार आहेत. मतमोजणी चंदगड तहसील कार्यालयातच होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाबासाहेब वाघमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गट व गणनिहाय आरक्षण आधीच जाहीर करण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात महिला, अनुसूचित जाती व नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद गट आरक्षण :
६५ अडकूर – सर्वसाधारण (महिला)
६६ माणगाव – नागरीकांचा मागासवर्ग (महिला)
६७ कुदनूर – सर्वसाधारण (महिला)
६८ तुडये – नागरीकांचा मागासवर्ग (महिला)
पंचायत समिती गण आरक्षण :
१२९ गवसे – अनुसूचित जाती (महिला)
१३० अडकूर – सर्वसाधारण
१३१ माणगाव – नागरीकांचा मागासवर्ग
१३२ कोवाड – नागरीकांचा मागासवर्ग (महिला)
१३३ कुदनूर – सर्वसाधारण
१३४ तुर्केवाडी – सर्वसाधारण
१३५ तुडये – सर्वसाधारण (महिला)
१३६ हेरे – सर्वसाधारण (महिला)
निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली असून,राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या काय करावे व काय करू नये या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले. निवडणूक काळात कोणतेही प्रलोभन, गैरप्रकार किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणारी कृती खपवून घेतली जाणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी वृषाली यादव (गटविकास अधिकारी), वैभव पाटील (गटशिक्षणाधिकारी), प्रकाश जोशीलकर (प्रभारी निवासी नायब तहसीलदार), शशिकांत किल्लेदार (प्रभारी निवडणूक नायब तहसीलदार), संभाजी देसाई-शिरोलीकर (तालुकाध्यक्ष-राष्ट्रीय काँग्रेस, चंदगड), दीपक कांबळे (तालुकाध्यक्ष, ब्लॅक पॅथर, चंदगड) यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments