Type Here to Get Search Results !

शब्दांच्या मैफिलीत न्हाऊन निघाला 'माडखोलकर'चा कॅम्पस

 


(कवी संजय साबळे यांच्या कवितांनी भरले चैतन्य,काव्यवाचन अन् बॉलीवूड डे ला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद)


चंदगड : प्रतिनिधी : शब्दांची लय,भावनांचा कल्लोळ आणि तरुणाईचा अफाट उत्साह अशा त्रिवेणी संगमात येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचा परिसर अलोट आनंदाने न्हाऊन निघाला. महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित 'काव्यवाचन' स्पर्धा आणि त्यासोबतच 'बॉलीवूड डे' व 'मिस-मॅच डे' या अनोख्या उपक्रमांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले दि न्यू इंग्लिश स्कूलचे उपक्रमशील शिक्षक व प्रसिद्ध कवी संजय साबळे यांनी आपल्या बहारदार आणि ओघवत्या शैलीतील काव्यसादरीकरणाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध केले.


कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले कवी संजय साबळे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. कविता ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून ती मानवी मनाची उघडलेली खिडकी आहे, असे सांगत त्यांनी साहित्याचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःला व्यक्त करण्यासाठी कविता हे सर्वात सशक्त माध्यम असल्याचे सांगताना त्यांनी विविध सामाजिक विषयांवरील आपल्या कविता सादर केल्या. साबळे यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच जोश निर्माण झाला होता. त्यांच्या शब्दांनी भारावलेल्या अनेक विद्यार्थ्यांनीही व्यासपीठावर येत आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले, ज्यामुळे कार्यक्रमात एक वैचारिक रंगत आली.


कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. गोरल यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचे कौतुक केले. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा सांस्कृतिक आणि साहित्यिक स्पर्धांचे आयोजन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर एम एम माने यांनीही विद्यार्थ्यांना अतिशय प्रभावीपणे मार्गदर्शन करून अशा कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन केले.तत्पूर्वी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. एन. के. पाटील यांनी केले. त्यांनी इंग्रजी विभागाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देत या कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. 


काव्यवाचनाच्या भावनिक वातावरणासोबतच सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित 'बॉलीवूड डे' आणि 'मिस-मॅच डे' मध्ये विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला.यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. ए. डी कांबळे यांनी बॉलीवूड डे आणि मिस मॅच डे याची संकल्पना स्पष्ट केली.बॉलीवूडमधील विविध पात्रांच्या वेशभूषेत वावरणारे विद्यार्थी आणि अतरंगी 'मिस-मॅच' फॅशनमुळे कॅम्पसमध्ये हास्याचे फवारे उडाले होते.


या सोहळ्याला प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, प्रा. ए. डी. कांबळे, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. जी. वाय. कांबळे, प्रा. आर. एस. पाटील, डॉ. एन. एस. मासाळ, प्रा. एल. एन. गायकवाड, प्रा. रामकृष्ण गडकरी, डॉ. बबली गावडे, डॉ. एस. एस. सावंत, डॉ. एस. डी गावडे, डॉ. पी. एल. भादवनकर, डॉ. बी. एम. पाटील, डॉ. आर. के. सूर्यवंशी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. एन. पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. आर. के. तेलगोटे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments