Type Here to Get Search Results !

सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच सर्व स्त्रियांचा उद्धार-मनस्विनी उर्फ माधुरी कांबळे


बहुजन क्रांती सामाजिक संघटनेतर्फे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वैचारिक जागर


चंदगड/प्रतिनिधी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या सामाजिक कार्यकर्त्या मनस्विनी उर्फ माधुरी  कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा आजच्या समाजाला विसर पडत चालल्याची तीव्र खंत व्यक्त करत, उपस्थितांना अंतर्मुख करणारे, अभ्यासपूर्ण भाषण केले.


मनस्वीनी कांबळे आपल्या भाषणात म्हणाल्या,की, “आज आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करतो; पण त्यांच्या शिक्षणासाठीच्या संघर्षाचा, त्यांनी सहन केलेल्या अपमानाचा आणि महिलांसाठी केलेल्या त्यागाचा विसर हळूहळू पडत चालला आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.” असे सांगून त्या पुढे म्हणाल्या की,“ज्या काळात मुलींनी शिकणे म्हणजे गुन्हा मानला जात होता, त्या काळात सावित्रीबाईंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. शाळेत जाताना त्यांच्यावर शेण, दगडफेक, शिवीगाळ झाली; तरीही त्यांनी शिक्षणाचा दिवा विझू दिला नाही. हा इतिहास केवळ पुस्तकांत मर्यादित राहता कामा नये. “सावित्रीबाईंनी केवळ शाळा सुरू केल्या नाहीत, तर विधवांसाठी आश्रयगृहे, बालहत्या प्रतिबंधासाठी कार्य आणि स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी लेखन व कविता केल्या. आज शिक्षित स्त्री स्वावलंबी झाली आहे; पण त्यामागचा संघर्ष आपण विसरत चाललो आहोत.”


आजही अनेक मुली शिक्षणापासून वंचित आहेत, बालविवाह, हुंडाबळी, अत्याचार थांबलेले नाहीत. त्यामुळे सावित्रीबाईंचा विचार हा जयंतीपुरता न ठेवता तो कृतीत उतरवणे ही काळाची गरज आहे.”प्रत्येक कुटुंबाने मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा आणि सावित्रीबाईंच्या विचारांची मशाल पुढील पिढीकडे द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या स्पष्ट आणि परखड भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. जी. वाय. कांबळे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “बहुजन समाजाचा विकास शिक्षणाशिवाय शक्य नाही. सावित्रीबाईंच्या विचारांना कृतीची जोड दिली, तरच खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन घडेल.”


कार्यक्रमाचे  प्रास्ताविक संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते शरीफ सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार संदीप कांबळे यांनी केले, तर आभार बहुजन संघटक पी.डी सरवदे यांनी मानले. यावेळी शाहीर मधुकर कांबळे, भिकाजीराव भोगोलिकर, अबू उर्फ गोविंद सुतार, पांडुरंग कांबळे, आनंद कांबळे, राजू कांबळे यांनीही आपले विचार मांडले.या कार्यक्रमास अजित शेरशेट्टी, संतोष कांबळे, रमेश सुतार,लखन कांबळे, चंद्रकांत कांबळे, राजेश कांबळे, अमोल कांबळे, संदीप यादव, अजित पाटील यांच्यासह बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा जागर करण्यात आला.

Post a Comment

0 Comments