Type Here to Get Search Results !

तिलारीतील जुने सब पोस्ट ऑफिस अचानक स्थलांतरित; ग्रामस्थांचा तीव्र संताप

 


(पूर्वसूचना, ग्रामसभा न घेता निर्णय; ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना फटका,‘पोस्ट ऑफिस आमचं हक्काचं-पूर्ववत सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा)


राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : तिलारी येथे अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले जुने सब पोस्ट ऑफिस कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याने तिलारीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे तिलारी व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिकांना दैनंदिन व्यवहारांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.ग्रामीण भागासाठी पोस्ट ऑफिस हे केवळ टपाल व्यवहारांचे केंद्र नसून, ज्येष्ठ नागरिकांचे निवृत्तीवेतन, शासकीय योजनांचे लाभ, बचत खाते, शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार तसेच विद्यार्थ्यांचे पत्रव्यवहार यांचे महत्त्वाचे केंद्र आहे. असे असताना कोणतीही ग्रामसभा न घेता, लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता पोस्ट ऑफिस स्थलांतरित करणे म्हणजे ग्रामस्थांच्या हक्कांवर गदा आणल्यासारखे असल्याची तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.


या अचानक स्थलांतरामुळे ज्येष्ठ नागरिक, महिलांना व विद्यार्थ्यांना दूर अंतरावर जावे लागत असून आर्थिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. “पोस्ट ऑफिस चोरीला गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहे. प्रशासनाच्या या मनमानी निर्णयाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष असून, लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


दरम्यान, तिलारी ग्रामस्थांनी तालुक्याचे आमदार तसेच संबंधित टपाल व प्रशासन विभागाकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. स्थलांतरित झालेले सब पोस्ट ऑफिस त्वरित पूर्ववत तिलारी येथे सुरू न केल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.ग्रामीण जनतेच्या मूलभूत सुविधांबाबत निर्णय घेताना लोकांशी संवाद व विश्वासात घेणे आवश्यक आहे, अशी मागणी यानिमित्ताने जोर धरू लागली असून प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments