(काकड आरती, कीर्तन, हरिजागरातून अखंड नामस्मरण; वारकरी संप्रदायाला बळकटी देणारे प्रबोधन,विद्यार्थी, ग्रामस्थ व विविध मंडळांचा सहभाग; अध्यात्मातून समाजप्रबोधनाचा आदर्श सोहळा)
राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : चंदगड तालुक्यातील दाटे गावात ग्रंथराज ज्ञानेश्वर माऊलींच्या पारायणानिमित्ताने अखंड भक्ती, श्रद्धा आणि समाजप्रबोधनाचा संगम अनुभवायला मिळाला. दि. २६ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला.या आध्यात्मिक उपक्रमाचे नियोजन डॉ. विश्वनाथ पाटील तसेच पारायण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक केले. काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारची संगीत भजने, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आणि रात्रीचा हरिजागर अशा अखंड नामस्मरण उपक्रमांमुळे वारकरी संप्रदायाची परंपरा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचली.
या सोहळ्यात आळंदी देवस्थानाशी संबंधित नामवंत कीर्तनकारांनी केलेले अध्यात्मिक प्रबोधन हे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक जाणीव जागवणारे ठरले. त्यांच्या विचारांमधून श्रद्धा दृढ झाली, भक्तीला दिशा मिळाली आणि सांप्रदायिक एकतेचा संदेश सर्वदूर पोहोचला.
या पारायण सोहळ्यात कोनेवाडी, दाटे, करंजगाव, शिरगाव, बेळेभाट, तावरेवाडी, जट्टेवाडी या गावांनी एकत्र येत प्रसाद निर्मिती व वाटपाचे नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन केले. ‘सेवा हाच खरा धर्म’ हा विचार प्रत्यक्ष कृतीतून अनुभवायला मिळाला.विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित शिबिरातील विद्यार्थी व गुरुजींनी स्वच्छता, प्रसाद वाटप आणि सेवाकार्यात उत्स्फूर्त सहभाग घेत सामाजिक जबाबदारीचे भान जपले. त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या निमित्ताने साजरा करण्यात आलेल्या दीप उत्सव उपक्रमात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला आणि माऊलींच्या सोहळ्याचा आनंद लुटला.योग्य नियोजन, प्रभावी मार्गदर्शन आणि पारायण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या समर्पित सेवेने हा उपक्रम केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता अध्यात्मातून समाजप्रबोधन करणारा प्रेरणादायी आदर्श ठरला असून, दाटे गावाचा हा सोहळा तालुक्यासाठी दिशादर्शक ठरत आहे.

Post a Comment
0 Comments