Type Here to Get Search Results !

अखेर तुडिये–बेळगाव बस सेवा पुन्हा सुरू

 


तीन–चार दिवसांच्या उपोषणाला यश; ग्रामस्थांना मोठा दिलासा


राजेंद्र शिवणगेकर/चंदगड:  तुडिये ते बेळगाव या महत्त्वाच्या बस मार्गावरील सेवा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी गेले तीन ते चार दिवस तुडिये येथे सुरू असलेल्या उपोषणाला अखेर यश आले आहे. बस सेवा बंद असल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी, नोकरदार व रुग्ण यांची मोठी गैरसोय होत होती. अखेर आज बेळगाव येथे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मध्यस्थीमुळे हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला असून तुडिये–बेळगाव बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.


या विषयासाठी बेळगाव येथे झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर दुपारी १.३० वाजता तसेच सायंकाळी ४.०० वाजता तुडिये–बेळगाव या मार्गावर बस सेवा नियमित व सुरळीतपणे सुरू राहणार असल्याची खात्री देण्यात आली आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.या आंदोलनामध्ये माजी आमदार राजेश पाटील, तुडिये गावचे सरपंच विलास पाटील, तसेच प्रशांत गावडा व तुडिये गावातील शिष्टमंडळाने सातत्याने पाठपुरावा करत महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामस्थांच्या समस्या शासन दरबारी ठामपणे मांडून बस सेवेचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.


बस सेवा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण, नोकरदारांची दैनंदिन प्रवास व्यवस्था तसेच रुग्णांची आरोग्य सेवा यांना मोठा आधार मिळणार आहे. ग्रामीण भागातील दळणवळणाच्या दृष्टीने ही बस सेवा अत्यंत महत्त्वाची असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून संबंधित सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आभार मानले आहेत.सार्वजनिक प्रश्नांसाठी शांततेच्या मार्गाने केलेले आंदोलन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून मिळालेले हे यश अन्य गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments