Type Here to Get Search Results !

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ‘चलो पारगड!’ युवकांसाठी प्रेरणादायी साहसी मोहीम

 


राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून “चलो पारगड! युवा शक्तीचा जागर” या नावाने युवकांसाठी एक आगळीवेगळी, साहसी आणि प्रेरणादायी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, नेतृत्वगुण, संघभावना आणि इतिहासाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवली जात आहे.


ही मोहीम किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे शुक्रवार दिनांक 17 जानेवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता सुरू होऊन शनिवार 18 जानेवारी रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत पार पडणार आहे.या मोहिमेअंतर्गत युवकांना ऐतिहासिक भ्रमंतीचा अनुभव घेता येणार असून किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे, तटबंदी व गडाचा इतिहास प्रत्यक्ष पाहता येणार आहे. तसेच चांदण्यांच्या साक्षीने गडाच्या कुशीत मुक्काम असा आगळा निवासी अनुभव सहभागी युवकांना मिळणार आहे.


रात्रीच्या वेळी कॅम्प फायरचे आयोजन करण्यात आले असून या दरम्यान साहसी वातावरणात गप्पा, गाणी व अनुभवांची देवाणघेवाण होणार आहे. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर आधारित प्रेरणादायी युवक संवाद सत्र आयोजित करण्यात आले असून युवकांना आत्मविश्वास, कर्तृत्व व राष्ट्रसेवेची दिशा देण्याचा हा प्रयत्न आहे.मोहिमेतील विशेष आकर्षण म्हणजे ‘खजिना शोध’ (Treasure Hunt) हा मोठा साहसी खेळ असून यामुळे युवकांमध्ये टीमवर्क, निर्णयक्षमता व नेतृत्वगुण विकसित होतील.


या मोहिमेसाठी सहभागी युवकांनी बॅकपॅक, पाण्याची बाटली, टॉर्च, थंडीपासून संरक्षणासाठी पुरेसे उबदार कपडे तसेच ग्रिप असलेले ट्रेकिंग शूज सोबत ठेवणे आवश्यक आहे. आयोजकांच्या वतीने रात्रीचे जेवण व सकाळचा नाश्ता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ही मोहीम पूर्णतः मोफत (FREE ENTRY) असून सहभागासाठी युवकांनी आपले नाव व महाविद्यालयाचे नाव देऊन दिलेल्या QR कोडद्वारे नोंदणी फॉर्म भरून सहभाग निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीची अंतिम तारीख 16 जानेवारी असून ही मोहीम फक्त 16 ते 25 वयोगटातील मुलांसाठी आहे.



नोंदणी व अधिक माहितीसाठी

केदार गावडे – 9146025894

अरविंद मुदाळे – 9403106912

अमृत भिंगुडे – 7517907569

या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.


स्वामी विवेकानंदांच्या “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका” या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणारी ही मोहीम युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments