Type Here to Get Search Results !

क्रशर बंद करण्याचे आदेश धाब्यावर; चंदगड तहसील कार्यालयात ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू


चंदगड (प्रतिनिधी) : मांडेदुर्ग गावाच्या हद्दीत तसेच सुंडीगावालगत सुरू असलेल्या खडी क्रशर मशिनमुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून, प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार ५ जानेवारीपर्यंत क्रशर बंद न झाल्याने आजपासून चंदगड तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.


ग्रामसभेत तीव्र विरोध नोंदवूनही आणि ३१ जानेवारी २०२५ रोजी तहसील कार्यालयात निवेदन सादर करूनही संबंधित क्रशर मशिन अद्याप सुरूच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कडगावकर शेत डोंगर परिसरात सुमारे १०० फूट खोल जिलेटीन ब्लास्टिंग केले जात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


२६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.१५ वाजता झालेल्या तीव्र स्फोटामुळे, सुमारे ६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेने मांडेदुर्ग गाव हादरले. या स्फोटामुळे अनेक घरांना तडे गेले, काचेच्या खिडक्या फुटल्या, टीव्ही व घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही जनावरे मृत्युमुखी पडली असून, या धक्क्यामुळे कै. सुंदराबाई शिवाजी पवार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.


या ब्लास्टिंगमुळे रोजगार हमी योजनेतून बांधलेल्या विहिरींना तडे गेले असून, जलजीवन मिशनअंतर्गत उभारलेली पाण्याची टाकी लिकेज झाली आहे. सुमारे २०० बायोगॅस प्रकल्प निकामी झाले असून, पाणलोट क्षेत्रातील १५ लाख रुपये खर्चाचे दोन माती नाला बंधारे धोक्यात आले आहेत.


दरम्यान, क्रशरच्या ५० टन क्षमतेच्या मालवाहू वाहनांची रात्रंदिवस सुरू असलेली वाहतूक गावात प्रचंड धूळ व कर्णकर्कश आवाज निर्माण करत आहे. यामुळे दमा, श्वसनविकार, मानसिक तणाव वाढला असून, मराठी शाळेजवळून होणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व अभ्यासावर गंभीर परिणाम होत आहे.


धुळीमुळे भात, नाचणी, काजू व जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले असून, परिसर वनक्षेत्रात असल्याने वन्यप्राणी गावात येऊन शेतीचे नुकसान करत आहेत. यापूर्वी डंपर अडविल्याच्या कारणावरून क्रशर मालकाने ग्रामपंचायत पदाधिकारी व युवकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.


क्रशर मशिन तात्काळ व कायमस्वरूपी बंद कराव्यात, नुकसानग्रस्त मालमत्तेचे पंचनामे करून भरपाई द्यावी व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांसाठी मांडेदुर्ग गावातील नागरिक, शेतकरी, महिला, युवक, वृद्ध व बालक यांच्या वतीने शांततामय साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments