१६ ते ३० जानेवारीदरम्यान ज्ञान, नाम व संतविचारांची गंगा घरोघरी पोहोचविण्याचा संकल्प
राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : सद्गुण, सद्विचार, मानवी उत्कर्ष आणि सकारात्मक परिवर्तनासाठी संतविचारांची ज्ञानगंगा समाजाच्या प्रत्येक थरापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने तुडये पंचक्रोशीतील कार्वे–मांडेदुर्ग परिसरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघणाऱ्या पायी दिंडी सोहळ्याचे चौथ्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे. हा दिंडी सोहळा शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सुरू होऊन शुक्रवार दि. ३० जानेवारी २०२६ रोजी पंढरपूर येथे सांगता होणार आहे.
“ज्ञान-विज्ञानाची शिदोरी, ग्रंथगंगा घरोघरी” हा संदेश देत हा सोहळा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाची चळवळ ठरत आहे. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्या विचारातून मानवी मनावर आमूलाग्र बदल घडविण्याचे सामर्थ्य या वारीतून अनुभवायला मिळणार आहे.दि. १६ जानेवारी रोजी सकाळी ठीक ७.०० वाजता तुडये गावातून नगरप्रदक्षिणा काढून दिंडीचे प्रस्थान होणार आहे. यावेळी रालिंग तीर्थजल गंगा पूजन कार्यक्रम पार पडणार असून, पूजन मा. श्री. खाधु सोमान्ना पाटील व मा. श्री. गणपती रामू पाटील (तुडये) यांच्या हस्ते होणार आहे.
दिंडी प्रस्थान पूजनप्रसंगी ह.भ.प. अनंत हरी पाटील (मु. पाटपन्हाळा, ता. राधानगरी),शशिकांत आप्पा सावंत (निवृत्त पं.स. बिडीओ, मु. बुरुडे, ता. आजरा),संदीप जोतीबा बिर्जे (सरपंच, किणी),मारुती खेतु पाटील (माजी सरपंच, तुडये),रघुनाथ गावडू पाटील,परशराम देवाप्पा पाटील (तुडये),विष्णू गणपती झाझरी (तुडये) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही दिंडी सरोळ, ढोकोळी, डेकोळीवाडी, तुर्केवाडी, यशवंतनगर, कार्वे, मांडेदुर्ग, ढोलगरवाडी, कडलगे खुर्द, कडगले बु., नागरदाळे, किणी, हुंदळेवाडी, कागणी, कालकुंद्री, कुदनूर, तळगुळी, राजगोळी खुर्द, राजगोळी बु., चन्नेटी या मार्गाने पंढरपूरकडे मार्गक्रमण करणार आहे.या सोहळ्याचे संस्थापक, अध्यक्ष व प्रवर्तक ह.भ.प. संभाजी तुकाराम चिटमुरकर (कार्वे) असून, ह.भ.प. श्री. नारायण यलुप्पा पाटील (सरोळी) सचिव म्हणून कार्यरत आहेत. नामधारक श्री. बाळासाहेब भरमु मेणसे (शिनोळी), सहसचिव ह.भ.प. आप्पा बैजू गावडे (यमेहट्टी), खजिनदार ह.भ.प. श्री. विठ्ठल पांडुरंग कांबळे (तुडये) यांच्यासह अनेक वारकरी कार्यकर्ते या वारीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. पायी दिंडीसाठी ट्रॅक्टर सेवा श्री. उदय उमाजी सुतार (तुडये) यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे.
भिमा–चंद्रभागा वारकरी शिक्षण संस्था, कोल्हापूर जिल्हा सभासद नोंदणी लवकरात लवकर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांनी टाळ, ताट–वाटी व आवश्यक साहित्य सोबत आणावे, अशी नम्र विनंती मंडळाने केली आहे.“विणा संस्कार नाही उद्धार” हा संदेश देत, गजर कीर्तनाचा, गजर नामाचा, गजर वारीचा अनुभव घेण्यासाठी पंचक्रोशीतील वारकरी, भाविक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच या पायी वारीसाठी आपले सहकार्य, सहभाग व आर्थिक मदत द्यावी, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.
“चला पंढरपूरला जाऊ, नादब्रह्म डोळा पाहू” या भावनेतून निघणारा हा सोहळा श्रद्धा, सेवा आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडविणारा ठरणार आहे.


Post a Comment
0 Comments