Type Here to Get Search Results !

तांबुळवाडी-माणगाव रस्ता कामकाजाची पाहणी,दर्जेदार रस्त्यासाठी कॉन्ट्रॅक्टरना सूचना

 


दर्जेदार व सुरक्षित रस्त्यासाठी कॉन्ट्रॅक्टरना सूचना; बागिलगेतील रस्ता रुंदीकरण व स्पीड ब्रेकरची मागणी मान्य


राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी ते माणगाव या महत्त्वाच्या अंतर्गत रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर असून, हा रस्ता भक्कम, मजबूत व शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावा, या उद्देशाने संबंधित लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. यावेळी रस्त्याच्या कामकाजात दर्जा, टिकाऊपणा आणि भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन काम करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना कॉन्ट्रॅक्टरना देण्यात आल्या.


या पाहणीदरम्यान बागिलगे गावातील गणपती मंदिरापासून रवळनाथ मंदिराच्या संरक्षण भिंतीपर्यंतचा रस्ता रुंदीकरण करून विकसित करावा, अशी ठोस मागणी करण्यात आली. हा रस्ता धार्मिक, शैक्षणिक व दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्याचे रुंदीकरण केल्यास वाहनांची कोंडी कमी होऊन अपघातांचा धोका टळणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.


याचबरोबर गणपती मंदिर, मराठी शाळा आणि रवळनाथ मंदिर या संवेदनशील ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्पीड ब्रेकर बसवावेत, अशी जोरदार मागणी करण्यात आली. लहान विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ लक्षात घेता वाहतुकीचा वेग नियंत्रणात राहणे अत्यावश्यक असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांकडून ही मागणी मान्य करण्यात आली, त्यामुळे लवकरच या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत.


या पाहणीवेळी सरपंच नरसू पाटील, सदानंद पाटील सर, नंदकुमार पाटील सर तसेच सामाजिक कार्यकर्ते संभाजी पाटील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रस्ते विकासाच्या कामात गुणवत्ता, पारदर्शकता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.


तांबुळवाडी–माणगाव रस्त्याच्या कामामुळे परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून, बागिलगे गावातील रस्ता रुंदीकरण व स्पीड ब्रेकरच्या निर्णयामुळे अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षितता वाढणार आहे. या विकासकामांमुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून, प्रशासनाने कामे वेळेत व दर्जेदार पूर्ण करावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments