उपनगराध्यक्ष पदासह निवडीकडे चंदगडकरांचे लक्ष
राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : चंदगड नगरपंचायतीतील स्वीकृत नगरसेवक पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता चंदगडकरांमध्ये शिगेला पोहोचली आहे. स्वीकृत नगरसेवक पदासह उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडेही सर्वांचे लक्ष लागले असून बुधवारी, दि. 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून नगरपंचायत सभागृहात या निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी एकूण तीन उमेदवार रिंगणात असून, नियमानुसार आणि सभागृहातील संख्याबळ लक्षात घेता दोन उमेदवारांच्या गळ्यात ही माळ पडणार आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला एक, तर विरोधी राजर्षी शाहू विकास आघाडीला एक स्वीकृत नगरसेवक पद मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालयात स्वीकृत नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून चेतन शेरेगार आणि चंदगड भाजपचे शहराध्यक्ष अमेय सबनीस यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे भाजपकडून कोणाची निवड होणार, याबाबत सध्या मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तर विरोधी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या वतीने संजय चंदगडकर यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला आहे.
भाजपकडून दोन अर्ज दाखल झाल्यामुळे सत्ताधारी गटातील अंतर्गत समीकरणे आणि नेतृत्वाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवक पदासोबतच उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडेही संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे.
नियमानुसार स्वीकृत नगरसेवकांची नावे नगराध्यक्ष सुनील काणेकर हे जाहीर करणार असून, या निवडीबाबत ते कोणता निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष केंद्रीत झाले आहे. बुधवारी होणाऱ्या निवड प्रक्रियेनंतर चंदगड नगरपंचायतीतील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

Post a Comment
0 Comments