कार्यक्रमात कोमल शेटजी, प्राथमिक शिक्षण कालकुंद्री यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेत महिलांसमोर त्यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र उलगडून सांगितले. “आम्ही महिला सावित्रीच्या लेकी आहोत. सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळेच आज महिला विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत,” असे त्यांनी सांगत स्त्रीशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.धन्वंतरी देसाई, डीआरपी कृषी विभाग, कोल्हापूर यांनी महिलांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) विषयी मार्गदर्शन केले. या योजनेचा लाभ घेऊन महिलांनी घरगुती व लघुउद्योग कसे सुरू करू शकतात, स्वयंरोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येतील, याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. पद्मजा गावडे, समुपदेशक, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज या उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना दैनंदिन जीवनात आरोग्य कसे जपावे, तणावमुक्त जीवनशैलीचा अवलंब कसा करावा व आनंदी जीवन जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा, याबाबत अतिशय मार्मिक व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणाने महिलांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मकता निर्माण झाली.यावेळी ग्लोबल मराठा रणरागिणी ऑर्गनायझेशन आणि ग्रामपंचायत कालकुंद्री यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी सुरू असलेल्या मेहंदी, रांगोळी, ब्लाऊज मेकिंग तसेच नऊवारी साडी मेकिंग प्रशिक्षण उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या प्रशिक्षणार्थी महिलांनी आपले अनुभव व मत व्यक्त करत समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजया कांबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन गायत्री पाटील यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व महिलांना सौभाग्याचे वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.कालकुंद्री गावच्या सरपंच छाया जोशी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत महिलांनी अशा उपक्रमांचा लाभ घेऊन स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, ग्लोबल मराठा रणरागिणी अध्यक्ष धन्वंतरी देसाई, सचिव जयकुमार देसाई, प्रशिक्षिका संगिता लोखंडे, राजश्री निकम, ग्रामपंचायत सदस्य विठोबा पाटील, विलास शेटजी, प्रशांत मुतकेकर, स्वागता कदम, गीता पाटील, गायत्री पाटील, विजया कांबळे, गीता नाईक, ग्रामपंचायत अधिकारी ओमकार दिवेकर तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांनी उत्कृष्ट नियोजन केले.या कार्यक्रमामुळे कालकुंद्री परिसरातील महिलांमध्ये सामाजिक जागृती, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचा संदेश पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Post a Comment
0 Comments