राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : गडहिंग्लज तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी देण्यात येणारा ‘स्वच्छ सुंदर आदर्श शाळा पुरस्कार’ भावेश्वरी माध्यमिक विद्यालय, आमरोळी (ता. चंदगड), जि. कोल्हापूर या शाळेस जाहीर करण्यात आला आहे.
शाळेतील स्वच्छता, टापटीप व्यवस्थापन, शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व संस्कार तसेच परिसर स्वच्छतेबाबत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गडहिंग्लज तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने विद्यालयाचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.
या पुरस्काराचे वितरण शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी ठीक १२.०० वाजता कै. व्ही. एस. आलुरकर सभागृह, माध्यमिक पतसंस्था, गडहिंग्लज येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व कर्मचारी वर्गाने उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावा, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
या पुरस्कारामुळे भावेश्वरी माध्यमिक विद्यालय, आमरोळी (ता. चंदगड) यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अधोरेखित झाले असून, इतर शाळांसाठीही हा पुरस्कार प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments