कै. ए. बी. हगिदळे सर व कै. रवळनाथ पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपक्रम
राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व कौशल्य, आत्मविश्वास व विचार मांडण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने कै. ए. बी. हगिदळे सर (संस्थापक, श्री. व्ही. के. सी. पी. विद्यालय, कागणी) व कै. रवळनाथ पवार यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा – २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता श्री. व्ही. के. चव्हाण पाटील विद्यालय, कागणी (ता. चंदगड) येथे होणार आहे.
प्राथमिक गटासाठी विविध विषय
प्राथमिक गट (इ. ५ वी ते ७ वी) साठी विद्यार्थ्यांच्या वयोगटाला साजेसे व संस्कारक्षम विषय ठेवण्यात आले असून त्यामध्ये ‘आई मला शिवबा व्हायचं आहे’, ‘बालसंस्कार – पूर्वी आणि आता’, ‘सोशल मीडिया आणि विद्यार्थी’, ‘वाचनाचे महत्त्व’ तसेच ‘प्रदूषणमुक्त भारत’ या विषयांचा समावेश आहे.
प्राथमिक गटासाठी प्रथम क्रमांकास १५०१ रुपये, द्वितीय क्रमांकास १००१ रुपये, तर तृतीय क्रमांकास ५०१ रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. यासोबतच प्राथमिक गटासाठी चषकांचे प्रायोजन श्री राजू नाईक सर (सहाय्यक शिक्षक, श्री व्ही. के. सी. पी. विद्यालय, कागणी) यांच्याकडून करण्यात आले आहे.
माध्यमिक गटात सामाजिक व समकालीन विषय
माध्यमिक गट (इ. ८ वी ते १० वी) साठी ‘आजची शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांची गरज’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी आणि आजची परिस्थिती’, ‘महिला सक्षमीकरण आणि समाजातील अडथळे’, ‘देशाच्या विकासात भावी पिढीचे महत्त्व’ तसेच ‘डिजिटल युगातील गोपनीयता’ असे अभ्यासपूर्ण व विचारप्रवर्तक विषय देण्यात आले आहेत.
या गटात प्रथम क्रमांकास ५००१ रुपये, द्वितीय क्रमांकास ३००१ रुपये आणि तृतीय क्रमांकास २००१ रुपये रोख बक्षीस देण्यात येणार असून माध्यमिक गटासाठी चषके माऊली स्टील सेंटर, कोवाड यांच्या वतीने देण्यात येणार आहेत.
सर्व सहभागींस प्रमाणपत्र, ठळक नियमावली
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला पाच मिनिटांचा वेळ देण्यात येईल. स्पर्धकांची संख्या अधिक झाल्यास गटनिहाय फेऱ्या घेण्यात येणार असून प्रत्येक गटातील विजयी स्पर्धक पुढील फेरीसाठी पात्र राहील. लिखित साहित्य वापरण्यास मनाई असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. प्रत्येक स्पर्धकाला संकेतांक क्रमांक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धकांनी शालेय गणवेश परिधान करू नये, अशी सूचना आयोजकांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी, विचारमंच उपलब्ध करून देणारी व आत्मविश्वास वाढविणारी ही स्पर्धा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी व्हावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या स्पर्धेचे आयोजन श्री. व्ही. के. चव्हाण पाटील विद्यालय, कागणी व कै. रवळनाथ पवार फाउंडेशन, कोवाड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून आयोजन समितीचे अध्यक्ष कृष्णा बामणे तर सचिव दीपक पवार आहेत.

Post a Comment
0 Comments