कोवाड, माणगावसह संपूर्ण तालुक्यात आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर बोट
राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : चंदगड तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना अद्यापही मूलभूत आरोग्य सेवांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम, पारदर्शक व शिस्तबद्ध व्हावी, यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे विविध महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील सामाजिक कार्यकर्ते किरण कल्लाप्पा कोले यांनी या मागण्या मांडल्या असून, त्या तातडीने मान्य करण्यात याव्यात अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
कोवाडमध्ये दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज
कोवाड परिसरातील लोकसंख्या मोठी असून एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर संपूर्ण आरोग्य केंद्राचा ताण येत आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. यासाठी कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान दोन वैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावेत, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
माणगाव येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेळेचे बंधन
माणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. परिणामी रुग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेळेचे बंधन घालून नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सर्व PHC मध्ये माहिती फलक अनिवार्य
चंदगड तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार वेळापत्रक, उपस्थित वैद्यकीय व आरोग्य अधिकाऱ्यांची नावे तसेच संपर्कासाठी मोबाईल क्रमांक स्पष्टपणे फलकावर लिहून लावण्यात यावेत, जेणेकरून नागरिकांना आवश्यक माहिती सहज उपलब्ध होईल, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे आरोग्य सेवांमध्ये पारदर्शकता येईल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
तालुका आरोग्य अधिकाऱ्याची नियमित नेमणूक आवश्यक
सध्या तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेवर नियमित तालुका आरोग्य अधिकाऱ्याचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रांवरील नियंत्रण, देखरेख व नियोजनात अडथळे निर्माण होत आहेत. यासाठी नियमित तत्वावर तालुका आरोग्य अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
चंदगड सरकारी दवाखान्यात आकस्मिक भेटी
चंदगड येथील सरकारी दवाखान्यातील सेवा दर्जा सुधारण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आकस्मिक भेटी देऊन तपासणी करावी, जेणेकरून गैरप्रकार, हलगर्जीपणा थांबेल व रुग्णसेवा अधिक प्रभावी बनेल, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या सर्व मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य निर्णय न घेतल्यास, नागरिकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून प्रशासनाने याबाबत सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा मागणीदार किरण कल्लाप्पा कोले यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment
0 Comments