2️⃣ जयप्रकाश विद्यालयात ‘चला तणावमुक्त होऊया’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन
3️⃣ विनोद, किस्से आणि प्रेरणादायी विचारांतून विद्यार्थ्यांना तणावमुक्त जीवनाचा संदेश
राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात माणूस हसणं विसरत चालला असून, कामाचा ताण, अभ्यासाचा दबाव आणि वाढत्या अपेक्षांमुळे तणाव वाढत असल्याचे चित्र दिसून येते. या तणावावर मात करण्यासाठी हास्य हेच सर्वात प्रभावी आणि जालीम औषध आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते संजय साबळे यांनी केले.ते किणी येथील जयप्रकाश विद्यालयात आयोजित ‘चला तणावमुक्त होऊया’ या विशेष व्याख्यानात बोलत होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी, “उच्च स्वप्ने पाहा आणि त्या स्वप्नांचा सातत्याने पाठलाग करा. हसत-खेळत प्रयत्न केले, तर यश हमखास मिळते,” असे प्रेरणादायी विचार मांडले.
ग्रामीण शैलीतील विनोदी किस्से, दैनंदिन जीवनातील अनुभव आणि मार्मिक उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त जीवन जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या भाषणादरम्यान सभागृहात हास्याचे फवारे उडाले, तर विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.आजच्या धक्का-धकीच्या जीवनात आनंदी राहणे ही काळाची गरज असून, विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच मनःशांती जपावी, या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, आनंदी व तणावमुक्त जीवनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पी. जे. मोहणगेकर होते. प्रास्ताविक डी. एस. बिर्जे यांनी केले. कार्यक्रमास व्ही. एस. सुतार, पी. एन. तरवाळ आणि ए. जे. कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन एस. पी. कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी. व्ही. कुंभार यांनी मानले.

Post a Comment
0 Comments