आयेशा नाईकवाडे उपनगराध्यक्ष; अमेय सबनीस व संजय चंदगडकर स्वीकृत नगरसेवक
राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : चंदगड नगरपंचायतीतील स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदाबाबत गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली उत्सुकता अखेर संपुष्टात आली आहे. बुधवार, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता नगरपंचायत सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत नगराध्यक्ष सुनील काणेकर यांच्या उपस्थितीत अधिकृत घोषणा करण्यात आली.
या घोषणेनुसार आयेशा समीर नाईकवाडे यांची चंदगड नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सभागृहात सर्व सदस्यांनी स्वागत करत अभिनंदन केले. आयेशा नाईकवाडे यांच्या निवडीमुळे नगरपंचायतीत महिला नेतृत्वाला बळ मिळाल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून अमेय सबनीस,तर राजर्षी शाहू विकास आघाडीकडून संजय चंदगडकर यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली. दोन्ही नवनियुक्त स्वीकृत नगरसेवकांनी आज नगरपंचायतीत औपचारिक प्रवेश केला.यावेळी मुख्याधिकारी सुरज सुर्वे उपस्थित होते. त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत नगरपंचायतीच्या कामकाजात लोकहिताला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून चेतन शेरेगार व अमेय सबनीस, तर राजर्षी शाहू विकास आघाडीकडून संजय चंदगडकर यांनी अर्ज दाखल केले होते. सभागृहातील संख्याबळानुसार सत्ताधारी भाजपला एक व विरोधी आघाडीला एक स्वीकृत नगरसेवक पद मिळणार हे आधीच स्पष्ट झाले होते. त्यानुसार आज नगराध्यक्ष सुनील काणेकर यांनी अंतिम निर्णय जाहीर केला.स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर चंदगड नगरपंचायतीतील राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून, आगामी काळात विकासकामे, नागरी सुविधा व प्रशासकीय निर्णय अधिक गतिमान होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवनियुक्त उपनगराध्यक्ष आयेशा समीर नाईकवाडे, तसेच स्वीकृत नगरसेवक अमेय सबनीस व संजय चंदगडकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.यावेळी नगरसेवक सचिन सातवणेकर, सुधीर पिळणकर, सिकंदर नाईक, प्रमोद कांबळे, अजिंक्य पिळणकर, सिकंदर नाईक, सानिया आगा, सुचिता कुंभार, गायत्री बल्लाळ, एकता दड्डीकर, सुधा गुरबे, जयश्री वणकुंद्रे, शितल कट्टी, माधवी शेलार, सुभाष गावडे सह प्रमुख उपस्थिती माजी राज्यमंत्री भरमू आणा पाटील,सचिन बल्लाळ,नामदेव पाटील,शांताराम बापू पाटील,राजेश पाटीलसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments