Type Here to Get Search Results !

नागवे-ईनाम कोळींद्रे ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा,अन्यथा आंदोलन

 


कारवाई न झाल्यास पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा


राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : ग्रुप ग्रामपंचायत नागवे–ईनाम कोळींद्रे येथील गेल्या पाच वर्षांतील कारभारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता व कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती चंदगड यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. संबंधित ग्रामसेवक, सरपंच व सदस्यांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा शुक्रवार, सकाळी ११.३० वाजता पंचायत समिती चंदगड येथे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या पाच वर्षांत ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रारी करूनही कारभारात कोणताही सुधार झाला नाही. उलट काही कामे प्रत्यक्षात न करता ती पूर्ण झाल्याचे दाखवून निधी काढून घेतल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.नागवे–ईनाम कोळींद्रे येथे अंगणवाडी व शाळा दुरुस्ती, गावातील अंतर्गत गटारे व रस्ते दुरुस्ती, तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नळ कनेक्शनची कामे पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले, मात्र प्रत्यक्षात ही कामे झालेली नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे गावात आजही नियमित पाणीपुरवठा होत नाही, गटारे स्वच्छ नाहीत आणि नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे.


ग्रामस्थांनी माहिती अधिकार कायद्यान्वये मागितलेल्या माहितीस अद्याप उत्तर मिळालेले नाही. पहिल्या अर्जावर उत्तर न मिळाल्याने दुसरे अपील करण्यात आले, तरीही समाधानकारक उत्तर न मिळाल्याचा आरोप आहे. ग्रामसभांमध्येही प्रश्न विचारूनही ठोस उत्तरे देण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ऑनलाइन पोर्टलवर कामे पूर्ण झाल्याचे दाखविले असले तरी प्रत्यक्षात कामे दिसत नसल्याने संशय अधिक बळावला आहे.


या कथित गैरप्रकारांबाबत ग्रामसेवकांना तसेच पंचायत समितीला वारंवार तोंडी व लेखी कळवूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पंचायत समिती स्तरावर अपील करूनही दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.तरी येणाऱ्या दोन दिवसांत संबंधित ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांच्यावर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता नागवे–ईनाम कोळींद्रे ग्रामस्थ व तरुण पंचायत समिती चंदगड येथे आंदोलन करतील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.हे निवेदन जोतीबा पांडुरंग सुतार, तसेच ग्रामस्थ व तरुणांच्या वतीने अमोल प्रकाश नाडगौडा आणि रुपेश विजय कविटकर यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments