‘युवकांचा ध्यास, ग्रामीण भागाचा विकास’ या ब्रीदवाक्याखाली सात दिवसांचे सामाजिक उपक्रम
राजेंद्र शिवणगेकर/ चंदगड : सर्वोदय शिक्षण संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोवाड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने ‘युवकांचा ध्यास, ग्रामीण भागाचा विकास’ या ब्रीदवाक्याखाली दि. १० ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत श्री सातेरी देवालय, ढोलगरवाडी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचा उद्घाटन समारंभ शनिवार, दि. १० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजीदादा कागणीकर उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एम. व्ही. पाटील असणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत ढोलगरवाडीच्या सरपंच सुस्मिता संजय पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
श्रमदान, आरोग्य व जनजागृती उपक्रमांची रूपरेषा
शिबिराच्या कालावधीत दररोज सकाळी श्रमदान, स्वच्छता अभियान, ग्राम सर्वेक्षण, गटचर्चा असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
रविवार, दि. ११ जानेवारी रोजी श्रमदान उपक्रमाची सुरुवात होणार आहे.
सोमवार, दि. १२ जानेवारी रोजी बेळगाव येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
बुधवार, दि. १४ जानेवारी रोजी आर. झुनझुनवाला शंके आय हॉस्पिटल, नवी पनवेल (मुंबई) यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीर होणार असून त्यानंतर दुपारी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकप्रबोधन, युवक मार्गदर्शन व व्याख्याने
शिबिरादरम्यान दररोज सायंकाळी लोकप्रबोधन व सामाजिक जागृती या अनुषंगाने व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
वैभवशाली इतिहास आणि युवक, जनमानसातील छत्रपती शिवाजी महाराज, सर्व पिकांचे आहार व्यवस्थापन अशा विविध विषयांवर तज्ज्ञ वक्ते, प्राध्यापक व अभ्यासक युवकांना मार्गदर्शन करणार आहेत.
पारंपरिक खेळ
रस्सी खेच ,लंगडी या सारखे पारंपरिक खेळ गावातील युवक आणि शिबिरार्थी या गटात होणार आहेत
महिला सक्षमीकरण व सांस्कृतिक कार्यक्रम
गुरुवार, दि. १५ जानेवारी रोजी ‘सशक्त महिला – शाश्वत भारत’ या विषयावर हळदी-कुंकू व उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील महिलांचा सहभाग अपेक्षित आहे. त्याच दिवशी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगता समारंभ १६ जानेवारी रोजी
शिबिराचा सांगता समारंभ शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.ऍड. एन. एस. पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार दळवी उपस्थित राहणार आहेत.
या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सामाजिक भान, नेतृत्वगुण, लोकप्रबोधनाची जाणीव व ग्रामीण विकासाची बांधिलकी निर्माण व्हावी, हा शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा दीपक पाटील , सहकार्यक्रम अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आणि स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.


Post a Comment
0 Comments