Type Here to Get Search Results !

तरुणाईने व्यसनांच्या विळख्यातून बाहेर पडून राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे-डॉ.एस.एन.पाटील

 


चंदगड (प्रतिनिधी) : "तरुण पिढी ही कोणत्याही राष्ट्राची खरी संपत्ती असते, मात्र आजचा युवक विविध प्रकारच्या व्यसनांच्या विळख्यात अडकत चालला आहे. व्यसन हे केवळ शरीराचाच नव्हे, तर बुद्धी आणि भविष्याचाही नाश करते. त्यामुळे क्षणिक आनंदासाठी व्यसनांच्या आहारी न जाता युवकांनी श्रम आणि सेवेचा मार्ग स्वीकारावा. व्यसनमुक्त तरुणच खऱ्या अर्थाने बलशाली भारताचा आधारस्तंभ ठरू शकतो," असे परखड मत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे माजी जिल्हा रा. से. यो. समन्वयक व र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे हिंदी विभागप्रमुख डॉ. एस. एन. पाटील यांनी व्यक्त केले.


यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी यांच्या वतीने नांदवडे येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये 'व्यसनाधीनता आणि आजचा युवक' या विषयावर डॉ. एस. एन. पाटील यांचे प्रमुख व्याख्यान संपन्न झाले. आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत मार्गदर्शन करताना त्यांनी पुढे सांगितले की, आजच्या धावपळीच्या युगात केवळ अंमली पदार्थच नव्हे, तर मोबाईल आणि सोशल मीडियाचे व्यसनही तरुणाईला वास्तवापासून दूर नेत आहे. अशा काळात राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे युवकांना मातीशी जोडण्याचे आणि त्यांच्यावर सुसंस्कार करण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या ऊर्जेचा वापर विधायक कामांसाठी केल्यास समाजाचा कायापालट निश्चित होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शिवाजी गावडे होते. त्यांनी आपल्या भाषणात शिबिरार्थींना शिस्तीचे आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. शोभा गावडे यांच्या हस्ते उत्साही वातावरणात करण्यात आले. प्रारंभी, प्रा जी. जे. गावडे यांनी आपल्या प्रास्ताविकात श्रमसंस्कार शिबिराची उद्दिष्टे स्पष्ट करत गेल्या काही दिवसांत विद्यार्थ्यांनी गावात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या व्याख्यानामुळे शिबिरार्थींमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमाचा समारोप प्रा. रामसिंग पाडवी यांनी मानलेल्या आभाराने झाला. याप्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक, ग्रामस्थ आणि रा. से. यो. स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments