Type Here to Get Search Results !

आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा-डॉ.आय.आर.जरळी


चंदगड/प्रतिनिधी : “आपले आयुष्य हा एक रंगमंच आहे. प्रत्येकाला नियतीकडून एक भूमिका दिलेली असते; ती भूमिका प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने पार पाडली, तरच खऱ्या अर्थाने यश मिळते,” असा हृदयस्पर्शी व प्रेरणादायी संदेश हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. आय. आर. जरळी यांनी दिला.


चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या बी.कॉम. भाग-३ च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. आपल्या ओजस्वी आणि विचारप्रवर्तक भाषणातून डॉ. जरळी यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील खऱ्या मूल्यांची जाणीव करून दिली.ते पुढे म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात यश मिळवण्यासाठी केवळ पदवी पुरेशी नसून प्रामाणिकपणा, सातत्य, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन या गुणांची नितांत गरज आहे. अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकत पुढे जाण्याची वृत्ती जोपासावी. “वाईट सवयींपासून दूर राहा, वेळेचे व्यवस्थापन करा आणि आपल्या ध्येयाकडे एकाग्रतेने वाटचाल करा,” असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच समाजाप्रती जबाबदारी ओळखून सजग व संवेदनशील नागरिक बनण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, “तुमचे यश हेच महाविद्यालयाचे खरे यश आहे. आपल्या कर्तृत्वातून संस्थेचा लौकिक वाढवा आणि प्रामाणिकतेला जीवनात सर्वोच्च स्थान द्या.”कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. टी. ए. कांबळे यांनी प्रास्ताविक करून बी.कॉम.च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, शिस्त आणि सातत्य यांच्या जोरावर भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार निटूरकर व निर्मला गावडे यांनी सुरेखपणे केले, तर सायली गावडे यांनी आभार प्रदर्शन केले.


याप्रसंगी डॉ. एस. एस. सावंत, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. एन. के. पाटील, प्रा. पूजा देशपांडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.निरोप समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले असून, आठवणींच्या साक्षीने हा सोहळा संस्मरणीय ठरला.

Post a Comment

0 Comments