चंदगड प्रतिनिधी (रुपेश मऱ्यापगोळ ) : कोल्हापूर जिल्हा परिषद सत्ताकारणात आज एक महत्त्वाची घडामोड झाली आहे. कुदनूर मतदारसंघातून निवडून आलेल्या सौ. विद्या विलास पाटील (बसर्गे) यांची महिला व बालकल्याण सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी करत काही महत्त्वाच्या जागांवर विजय मिळवला. कुदनूर मतदारसंघातून विद्या पाटील, तुडये मतदारसंघात रचना राहुल गावडे आणि माणगाव मतदारसंघातून मानसी भोगण यांनी विजय संपादन केला.सत्तास्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रमुख पदांवर आपली छाप उमटवली असून माजी आमदार राजेश पाटील व नंदाताई बाभुळकर -कुपेकर यांच्या नेतृत्वाखाली ही रणनीती यशस्वी ठरली. दुसरीकडे भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले.
कुदनूर मतदारसंघातील निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली. एका घरातच विद्या पाटील आणि माजी सभापती ज्योती पाटील यांच्यात सामना झाला होता. या लढतीत विद्या पाटील यांनी विजय मिळवला.विद्या पाटील यांच्या निवडीमुळे महिला सक्षमीकरण, बालकल्याण योजना आणि ग्रामीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्वातून चंदगड तालुक्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment
0 Comments