Type Here to Get Search Results !

कुदनूर येथे भव्य करिअर मार्गदर्शन मेळावा; विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन


चंदगड : चंदगड तालुक्यातील कुदनूर येथे विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. सनस्टार  विमा सेवा केंद्र, कुदनूर यांच्या वतीने शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता श्री सिद्धेश्वर हायस्कूल, कुदनूर येथे भव्य करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी आणि पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम विशेष ठरणार आहे.


आजच्या स्पर्धात्मक युगात करिअर निवडताना विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय उपलब्ध असले तरी योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे अनेकदा संभ्रम निर्माण होतो. हीच गरज ओळखून विविध क्षेत्रातील तज्ज्ञ या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.


स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उद्योग निरीक्षक श्री. सुरज नारायण कांबळे हे एमपीएससी व यूपीएससी परीक्षांबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेले श्री. अर्जुन जानबा हराडे हे “शिक्षणाने माणूस समृद्ध होतो” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.


याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील संधींबाबत दशरथ तुकाराम बामणे BHMS, MD. हे माहिती देणार असून, अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी व आव्हाने यावर प्रा. प्रशांत ढोपे आणि श्री. जीवन चंद्रकांत कुंभार मार्गदर्शन करणार आहेत. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षण आणि करिअर क्षेत्रातील वाढता प्रभाव, संधी आणि आव्हाने यावरही सखोल चर्चा होणार आहे.


उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणसूत्रांबाबत श्री. दयानंद कृष्णा सलाम आणि श्री. पुंडलिक बाळासो कोकीतकर हे प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे मार्गदर्शन करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ नोकरीपुरतेच नव्हे, तर उद्योजकतेकडेही वळण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.


या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुदनूर गावातील विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या उद्योजकांचा सत्कार करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवरून मोठे यश मिळवलेल्या व्यक्तींचा सन्मान हा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.


“मुश्किल नहीं मिलती मंजिले, एक जुनून सा दिल में जगाना होता है…” या प्रेरणादायी संदेशातून चिकाटी, मेहनत आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. यश मिळवण्यासाठी वारंवार प्रयत्न करत राहणे आवश्यक असल्याचा संदेश या मेळाव्यातून दिला जाणार आहे.


विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक आणि व्यावसायिक भविष्य घडविण्यासाठी हा मेळावा अत्यंत उपयुक्त ठरणार असून, पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments