चंदगड- प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील उमगाव येथे जय भीम तरुण मंडळ, आंबेडकर नगर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. एस. एन. पाटील उपस्थित होते. आपल्या सखोल आणि अभ्यासपूर्ण भाषणात त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला. त्यांनी काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन, चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन, तसेच हिंदू कोड बिल यांसारख्या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देत बाबासाहेबांच्या संघर्षमय प्रवासाचे प्रभावी चित्र उभे केले.
डॉ. पाटील पुढे म्हणाले की, भारतीय समाजव्यवस्थेत समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेले भारतीय संविधान हे अमूल्य योगदान आहे. तसेच त्यांनी स्वीकारलेल्या बौद्ध धम्म द्वारे त्यांनी मानवतेचा आणि समतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच खरी त्यांना अभिवादनाची भावना ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्राध्यापक व्ही. के. गावडे यांनी मंडळाच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेत तरुणांना मार्गदर्शन केले. तसेच प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन करत शिक्षण व सामाजिक जाणीव यांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रभाकर गावडे यांनी प्रेरणादायी विचार मांडत समाजकार्याची दिशा स्पष्ट केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. एम. गावडे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे सामाजिक जागृतीला चालना मिळते, असे सांगितले.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या विद्या पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. कार्यक्रमास परसराम कांबळे, मनोहर कांबळे, किरण कांबळे, पांडुरंग कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंतीनिमित्त आयोजित होम मिनिस्टर व रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मनोहर कांबळे यांनी केले, तर परशराम कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत, उपस्थितांमध्ये सामाजिक जाणीव आणि प्रेरणा निर्माण करून गेला.

Post a Comment
0 Comments