चंदगड (प्रतिनिधी) : भोगोली (ता. चंदगड) येथील पुरातन जैन बस्ती तसेच स्थानिक आमदार शिवाजीराव पाटील यांच्या संदर्भात सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या आक्षेपार्ह व दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित व्हिडिओमध्ये चुकीची माहिती देऊन जैन समाजाच्या भावना दुखावण्याचा तसेच आमदारांविषयी मानहानीकारक विधान करण्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी स्थानिक ग्रामस्थांनी चंदगड पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देत संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडिओद्वारे जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच या प्रकरणामुळे हिंदू व जैन समाजामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, परिस्थिती गंभीर होण्यापूर्वीच पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, प्रशासनानेही या प्रकरणाची दखल घेत संबंधित व्हिडिओची चौकशी सुरू केली असून, दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संकेत मिळत आहेत.

Post a Comment
0 Comments