Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज - नेसरी -चंदगड राज्य मार्गावर अजून किती बळी घेणार?


दोन्ही तालुक्यातील प्रवाशी व विद्यार्थ्यांना बसतोय फटका,रस्ता करणाऱ्या कंपनीचा मनमानी कारभार,प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष 


संजय धनके /नेसरी : गडहिंग्लज - नेसरी -चंदगड राज्य मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या तीन-चार महिन्यांपासून संथगतीने सुरू असल्याने नेसरी ग्रामस्थांचा संताप उसळताना पाहायला मिळाला.एक पदरी काम पूर्ण नसताना दुसऱ्या पदरीच्या रस्त्याचे काम खोदून ठेवल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून धुळीचे साम्राज्य वाढले आहे.अपघातामधेही दिवसेंदिवस वाढ होत आहे.सध्या,सलग वळीव पावसामुळे रस्त्यावर चिखल होऊन अनेक वाहने घसरून अपघात होत आहेत.काही प्रवाशांना एसटी बस थांबल्याने दीड-दोन किलोमीटर पायी जावे लागत आहे.त्यामुळे एकंदरीत या चंदगड गडहिंग्लजकरांना या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.मध्यंतरी संतप्त ग्रामस्थांनी संबंधित कंपनीचे डम्पर अडवून आंदोलन केले.यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर मार्ग काढू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

   



आंदोलन स्थळी प्रोजेक्ट डेव्हलपर देशमुख यांना अपघातात प्रवाशांचे बळी घेणार का? असा प्रश्न महाराष्ट्र माझा 24 मीडियाच्या प्रतिनिधीने विचारला असता संबंधित व्यक्तीने सारवासारव केली.आणि दुसऱ्याच दिवशी या रस्त्याने एका तरुणाचा बळी घेतला.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बटकणंगले जवळील लाकूडवाडी घाटाच्या चढावातील असणाऱ्या वळणावर रस्त्याकडेला लावलेल्या काँक्रीट मिक्सर असलेल्या ट्रकच्या खालील माती खचून ट्रक पलटी झाला यात ट्रकचा चालक नौशाद शराफत खान रा.कमालपूर,जि.मिरजपुर  हा तरुण जागीच ठार झाला.जर हा रस्ता वेळीच झाला असता तर तरुणाचा नाहक बळी गेला नसता अशी नागरिकांच्यातून चर्चा होत आहे.तसेच जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी प्रांतधिकारी एकनाथ काळबांडे यांची भेट घेऊन रस्ता करणारी कंपनी, ठेकेदार यांची तात्काळ संयुक्त प्रशासकीय मिटिंग लावावी.व तालुक्यात या रस्त्यामुळे होणाऱ्या गैरसोयी व प्रश्न मार्गी लावावेत याविषयीं निवेदन दिले.


रस्ता बांधकामातील नियमानुसार दुतर्फा रस्त्याचे काम करत असताना एक बाजूने रस्ता पूर्ण झाल्यावर दुसरी बाजूचे काम सुरु करायचे असते.पण इथं तर दोनी बाजूने रस्ता खोदून रस्त्याची भीषण दुदर्षा या ठेकेदार व कंपनीने केली आहे.तसेच दिशादर्शक, धोकादायक ठिकाणी फलक किव्हा अन्य गोष्टीचा वापर केला नाही त्यामुळे प्रवाशांना या सर्व गोष्टीचा नाहक त्रास होत आहे.त्यामुळे सदर प्रकरण हे गंभीर असून सदर कंपनीवर कारवाई करण्यात यावी आणि रस्त्याचे काम जलदगतीने होऊन प्रवाशांना दिलासा मिळावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


Post a Comment

0 Comments