सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती घटतेय; पुस्तकांकडे वळण्याचे आवाहन,कार्वे येथे सरस्वती वाचनालयाच्या व्याख्यानमालेत ‘बदलती वाचन संस्कृती’ विषयावर मार्गदर्शन
चंदगड : चंदगड तालुक्यातील मौजे कार्वे येथे सरस्वती वाचनालय आयोजित सतराव्या व्याख्यानमालेत ‘बदलती वाचन संस्कृती’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात सौ. सुनिता साळुंखे-शिवणगेकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. “सखोल ज्ञानासाठी वाचन हाच सर्वोत्तम पर्याय आहे,” असा ठाम संदेश त्यांनी यावेळी दिला.
त्या म्हणाल्या की, आजच्या काळात ई-बुक्स आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. मात्र, पुस्तके माणसाच्या मनाचे पोषण करतात, मानसिक समृद्धी देतात आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशा दाखवतात. त्यामुळे तरुण पिढीने मूळ आणि दर्जेदार ज्ञानासाठी पुस्तकांकडे वळणे अत्यावश्यक आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज आणि सरस्वती वाचनालयाचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष द. य. कांबळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रकाश कांबळे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय श्रीकांत कांबळे यांनी करून दिला.
पुढे बोलताना सौ. साळुंखे-शिवणगेकर यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “पुस्तके माणसाचे मस्तक घडवतात आणि घडलेले मस्तक कोणाचेही हस्तक होत नाही.” वाचनामुळे आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो. लहानपणापासूनच मुलांमध्ये वाचनाची सवय लावणे ही पालकांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांची घडण वाचनातूनच झाल्याचे त्यांनी उदाहरणादाखल सांगितले.
अध्यक्षीय भाषणात विष्णू कार्वेकर यांनी सोशल मीडियावरील अपूर्ण आणि दिशाभूल करणाऱ्या ज्ञानावर टीका केली. “ज्याला मूळ, बीज आणि अर्थ नाही, असे ज्ञान सोशल मीडियावर आढळते. खऱ्या अर्थाने कसोटीवर टिकायचे असेल, तर वाचनाशिवाय पर्याय नाही,” असे ते म्हणाले.या कार्यक्रमास राजेंद्र शिवणगेकर, डॉ. प्रकाश दुकळे, रेणुका कांबळे, नारायण पाटील, जोतिबा आपके, पत्रकार राहुल पाटील, काजमिल फर्नांडिस, पुंडलिक पाटील, मधुकर कांबळे, संभाजी चिरमुरकर, महादेव दुकळे यांच्यासह मोठ्या संख्येने वाचक व श्रोते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू चिंचणगी यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड. कार्तिक पाटील यांनी केले. व्याख्यानमालेचे संयोजन जॉनी फर्नांडिस, सौ. हेमिल फर्नांडिस, सौ. चंदा कांबळे, सौ. उषा कांबळे आणि सुरेश कांबळे यांनी केले.

Post a Comment
0 Comments