Type Here to Get Search Results !

जनतेशी नातं जपा-मंत्री हसन मुश्रीफ


फक्त विकासकामे नव्हे, तर लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे आवाहन,जलजीवन मिशनसह प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश,वन्यप्राणी समस्येवर ‘वनतारा’ प्रकल्प, सोलर कर्ज योजनेची घोषणा


चंदगड : चंदगड तालुक्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर नव्या नेतृत्वासमोर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर रामपूर येथे आयोजित नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.“फक्त विकासकामे करून मतं मिळत नाहीत, तर लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणं तितकंच महत्त्वाचं आहे,” असा स्पष्ट संदेश देत त्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना जनतेशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याचे आवाहन केले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेश पाटील होते. प्रारंभी राजेंद्र शिवणगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करत रामपूर गावच्या ऐतिहासिक आणि सामाजिक वाटचालीचा आढावा घेतला.मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात आरोग्य, शिक्षण आणि पिण्याचे पाणी या मूलभूत गरजांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित योजना तातडीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी ‘वनतारा’ धर्तीवरील प्रकल्प राबवण्याचा शासनाचा विचार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून सोलर उर्जेसाठी कर्ज योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. “जितका वीज वापर, तितकाच हप्ता” या तत्त्वावर ही योजना कार्यान्वित होणार असून शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.


राजकीय टीकेला उत्तर देताना मुश्रीफ यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करत “आरोप करण्यापूर्वी सहकार क्षेत्राचा अभ्यास करा, काम करून दाखवा मग टीका करा,” असा टोला लगावला. तसेच शक्तिपीठ प्रकल्पाबाबत आपला विरोध कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.माजी आमदार राजेश पाटील यांनी राष्ट्रवादीच्या यशामागील संघटनशक्ती आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करत पुढील काळातही विकासकामे गतीने राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.


यावेळी सभापती विलास नाईक यांनी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील २४६ रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली. तर अॅड. संतोष मळवीकर यांनी आंदोलनांवरील कारवाईबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी विनंती केली.कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सुखदेव शहापूरकर, डॉ. प्रतिभा चव्हाण, विद्याताई पाटील, संग्रामसिंह कुपेकर, अमर चव्हाण आणि सुधीर देसाई यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


एकूणच, चंदगडमध्ये राजकीय परिवर्तनाची नवी दिशा दिसत असली तरी विकासासोबतच जनतेशी नातं जपण्याची खरी कसोटी आता नव्या नेतृत्वासमोर उभी राहणार असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.

Post a Comment

0 Comments