चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील न्हावेली येथील जिद्दी, अभ्यासू आणि बहुजन चळवळीतील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते अशोक पेडणेकर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला आहे. कोल्हापूर येथील 'समाजभूषण सदानंद डिगे मेमोरियल फाउंडेशनच्या'वतीने आयोजित भव्य सोहळ्यात त्यांना अत्यंत प्रतिष्ठेचा "समाजरत्न भीम क्रांती पुरस्कार" प्रदान करण्यात आला.त्यांच्या या यशामुळे संपूर्ण चंदगड तालुक्यातून अभिमान व्यक्त होत आहे.
कोल्हापूर येथे पार पडलेल्या या प्रेरणादायी सोहळ्याला विविध क्षेत्रांतील दिग्गजांची उपस्थिती लाभली होती.याप्रसंगी डॉ. दश्मिता जाधव, दिनकर आवळे यांच्यासह महाराष्ट्र माझा 24' चे संपादक ज्ञानेश्वर पाटील,प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते रमेश किरमटे,नारायण किरमटे आणि पत्रकार रोहित धूपदाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अशोक पेडणेकर यांना सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
अशोक पेडणेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात सामाजिक परिवर्तनासाठी झटत आहेत. समाजात समता आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी त्यांनी फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा वारसा जोपासला आहे.समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यांनी ग्रामीण भागात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी मोलाचे काम केले आहे. अज्ञान, अनिष्ट प्रथा आणि चुकीच्या समजुतींविरोधात त्यांनी सातत्याने जनजागृती मोहीम राबवली आहे.
अशोक पेडणेकर यांची सामाजिक बांधिलकी, कामातील तळमळ आणि निस्वार्थ वृत्ती यामुळे हा पुरस्कार त्यांना योग्य वेळी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळणार असून, भविष्यातही त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या सन्मानाबद्दल न्हावेली गावच्या ग्रामस्थांसह चंदगड तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments