Type Here to Get Search Results !

तांबुळवाडीच्या शताब्दी सोहळ्यात प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान ठरणार आकर्षण


राजेंद्र शिवणगेकर/चंदगड : चंदगड येथील मराठी विद्यामंदिर तांबुळवाडी या शाळेचा शताब्दी महोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा १ व २ मे २०२६ रोजी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा होत आहे. शंभर वर्षांची शैक्षणिक परंपरा जपत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या या शाळेच्या सोहळ्यात १ मे रोजी रात्री होणारे प्रा. नितीन संपतराव बानुगडे-पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.


एम.एस्सी. (भौतिकशास्त्र, पुणे विद्यापीठ) शिक्षण घेतलेले प्रा. बानुगडे-पाटील हे प्रेरणादायी वक्ते, लेखक व इतिहास अभ्यासक म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ओघवत्या व प्रभावी वक्तृत्वशैलीतून विद्यार्थ्यांना दिशा देणारे विचार, इतिहासातून प्रेरणा घेण्याचा संदेश आणि यशस्वी आयुष्याची सूत्रे मांडली जातात. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानाची ग्रामस्थ, विद्यार्थी व पालकांमध्ये विशेष उत्सुकता आहे.या व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निंगोजी गावडू पाटील (अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्त कमिटी) असणार असून उद्घाटक म्हणून शंकर जैनू पाटील (चेअरमन, सेवा सोसायटी तांबुळवाडी) उपस्थित राहणार आहेत. दीपप्रज्वलन विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.दरम्यान, १ मे रोजी सकाळी माजी विद्यार्थी मेळावा तसेच महिला मेळावा आयोजित करण्यात आला असून गावातील सामाजिक एकात्मता आणि शाळेशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


२ मे रोजी दुपारी शताब्दी महोत्सव सोहळा पार पडणार असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या विकासकामांचे उद्घाटन, सत्कार समारंभ व सन्मान सोहळा होणार आहे. त्याच दिवशी रात्री ९.३० वाजता वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  बाळू नारायण पाटील (सीईओ, वेस्टर्न ग्रुप, पुणे) तर उद्घाटक म्हणून  राजाराम रामचंद्र बिर्जे (उद्योजक, पुणे) उपस्थित राहणार आहेत.


शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त “सन्मान संस्कृतीचा सोहळा, शताब्दीचा मंत्र विद्यार्थी विकासाचा” हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला सर्व शिक्षणप्रेमी, आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments