चंदगड/प्रतिनिधी : चंदगड शहरातील पप्पू कॉलनी परिसरात २०२३ साली सुरू करण्यात आलेल्या अंडरग्राउंड गटर प्रकल्पातील स्लॅबचे काम अद्याप अपूर्ण राहिल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
पप्पू कॉलनीतील अनेक ठिकाणी गटारांवर स्लॅब बसवण्यात आलेले नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचत आहे. परिणामी दुर्गंधी, डासांची वाढ आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी हा परिसर धोकादायक बनला आहे.
यातच अधिक संतापजनक बाब म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांच्या निवासस्थानाजवळ मात्र ठेकेदाराकडून उच्च दर्जाचे काम पूर्ण करण्यात आले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत आणि प्राधान्यक्रमाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, उपअभियंता मुल्ला यांच्या सूचनेनुसारच गटराचे काम अर्धवट थांबवण्यात आले आहे. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली जात आहे. “सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असताना संबंधित यंत्रणा मात्र निष्क्रिय आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
सांडपाण्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात डेंग्यू, मलेरिया, त्वचारोग यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी पप्पू कॉलनीतील नागरिकांनी केली आहे.स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवणे अत्यावश्यक असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments