Type Here to Get Search Results !

ताम्रपर्णी, हिरण्यकेशी, घटप्रभा नदीतील गाळ काढा; अन्यथा पूरस्थिती गंभीर होणार : आमदार शिवाजी पाटील


चंदगड प्रतिनिधी (रुपेश मऱ्यापगोळ)  : संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पूर्वतयारी आढावा बैठकीत चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत ताम्रपर्णी, हिरण्यकेशी आणि घटप्रभा नदीपात्रातील साचलेला गाळ तातडीने काढण्याची जोरदार मागणी केली.


यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, २०१९ पासून चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यात पूराचा धोका सातत्याने वाढत असून नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडत असून नदीपात्रांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे. परिणामी अनेक गावे, रस्ते, पूल आणि शेतीक्षेत्र दरवर्षी पाण्याखाली जात असल्याचे त्यांनी सांगितले.


पूरपरिस्थितीमुळे नागरिकांच्या घरांचे, दुकानांचे तसेच पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. “या प्रश्नावर मी २०१९ पासून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे फाईली एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फिरत आहेत. प्रत्यक्षात मात्र कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.


यंदाच्या पावसाळ्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी करत चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांसाठी विशेष पूरनियंत्रण उपाययोजना राबविण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.


बैठकीत पूरनियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवणे, धोकादायक ठिकाणांची पाहणी करणे, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचे इशारे देणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत पोहोचविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments