चंदगड/प्रतिनिधी : चंदगड वनविभागाने वन्यजीव शिकार प्रकरणात मोठी आणि निर्णायक कारवाई करत मुख्य सूत्रधार आरोपी शबगीर दस्तगीर जमादार (रा. दानोळी) यास अटक केली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालय, खंडपीठ कोल्हापूर यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर वनविभागाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला ताब्यात घेतले.
वनपाल कानूर खुर्द यांचेकडील दाखल वनगुन्हा क्र. WL 01/2025, दि. 13 डिसेंबर 2025 मधील वन्यजीव शिकार प्रकरणात यापूर्वीच आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये तुकाराम अमृसकर, रियाज जमादार, अमीन मुजावर, दिगंबर अनगुडे, इर्शाद नदाफ, दाऊद नदाफ, अन्वर पटेल आणि यासिन उर्फ बबलू नदाफ यांचा समावेश असून हे सर्व आरोपी सध्या जामिनावर आहेत.
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार शबगीर जमादार व लखन हेगडे हे दीर्घकाळ फरार होते. दरम्यान शबगीर जमादार याने गडहिंग्लज येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने 23 जानेवारी 2026 रोजी तो अर्ज फेटाळला. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ कोल्हापूर येथे धाव घेतली होती.सुनावणीदरम्यान वनविभागाच्या तपास पथकाने न्यायालयात महत्त्वपूर्ण आणि ठोस पुरावे सादर केले.
सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड व वनपाल चंद्रकांत पावस्कर यांनी आरोपीच्या ताब्यातील छायाचित्रे, मोबाईल सीडीआर, तांत्रिक पुरावे तसेच इतर माहिती न्यायालयासमोर मांडली.तपासात गुन्हा घडला त्या दिवशी आरोपी शबगीर जमादार हा रेनॉल्ट डस्टर (MH-04-GE-0938) या वाहनात असल्याचे स्पष्ट झाले असून त्या वाहनातून धारदार आणि टोकदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. तसेच आरोपीच्या मोबाईलमधून वन्यप्राण्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे आणि वन्यजीव शिकार व बेकायदेशीर हालचालींसाठी वापरले जाणारे व्हॉट्सॲप ग्रुप आढळून आले आहेत.
या ग्रुपमध्ये काही प्रतिष्ठित व्यक्ती, हॉटेल व्यावसायिक आणि इतर सदस्यांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून संबंधित मजकूर व देवाणघेवाण तपासाअंतर्गत घेण्यात आली आहे.वनविभागाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे मा. उच्च न्यायालय, खंडपीठ कोल्हापूर यांनी 30 एप्रिल 2026 रोजी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आरोपी 6 मे रोजी वनपरिक्षेत्र कार्यालय, चंदगड येथे हजर झाला असता त्याला अटक करण्यात आली.दि. 7 मे रोजी आरोपीस प्रथम वर्ग न्यायालय, चंदगड येथे हजर केले असता न्यायालयाने 11 मेपर्यंत वनकोठडी सुनावली होती. त्यानंतर आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता वनविभागाचा पुढील तपासासाठीचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. न्यायालयाने आरोपी शबगीर जमादार यास 14 मे 2026 अखेर वनकोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक फरार आरोपी लखन हेगडे (रा. माणगाववाडी) याचा शोध सुरू असून वनविभागाचे तपास पथक त्याच्या मागावर आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील व सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड, वनपाल चंद्रकांत पावस्कर आणि वनरक्षक विकास राऊत हे करीत आहेत.वन्यजीव शिकार, अवैध वृक्षतोड किंवा जंगलातील अतिक्रमणासंदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Post a Comment
0 Comments