पाण्यासाठी मायलेकींची वणवण भटकंती...
चंदगड : चंदगड तालुक्यातील विंझणे या गावी नुकताच श्री.भैरवनाथ देवस्थान मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या भक्तीमय आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. ६ ते ८ मे रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. तसेच गावातून देव भैरवनाथ मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. गावातील लहान व्यक्तीपासून अबाल वृद्धापर्यंत यांनी या भव्य-दिव्य मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी तरुणाकडून दांडपट्टा, फुगडी, नृत्य याचे सादरीकरण करण्यात आले. आणि भैरवनाथाच्या नावानं चांगभलं... छत्रपती शिवाजी महाराज की जय... असा जयघोष करण्यात आला. विशेष म्हणजे रखरखत्या उन्हात माहेरवाशीनी, माय-लेकीने डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. यादरम्यान गावात अभूतपूर्व असे भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. "याची देही याची डोळा" सोहळा पाण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
पाणी नसताना सोहळा कशासाठी...?
मात्र दुसरीकडे एवढा मोठा ऐतिहासिक सोहळा असताना गावात पाणी नसल्याने महिलांनी, ग्रामस्थांनी आणि भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाणी नसताना एवढा मोठा सोहळा याचे नियोजन का केले गेले? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. या तीन दिवसीय झालेल्या सोहळ्यात अनेक धार्मिक कार्यक्रम,विधीवध मंत्रोच्चार, भजन, हरिपाठ, कीर्तन आदी पार पडले. मात्र हे कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील महिलांना वेळच मिळाला नाही. कारण त्यांचा पूर्ण वेळ विहिरीवरून, तळ्यावरून किंवा अन्य ठिकाणावरून पाणी आणण्यातच जात होता. पाणी नसताना हा सोहळा का घेतला जात आहे? आम्हाला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. पाण्याची आधीच व्यवस्था का केली गेली नाही? असा संतापजनक सवाल महिला उपस्थित करत आहेत.
यावर्षीची पाणीपट्टी भरू नये...
तीन दिवसीय चाललेल्या या सोहळ्यात पाणी नसल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला. कार्यक्रम चांगला झाला, पण समाधानकारक झाला नाही अशी भावना लोकांची आहे. तर अनेकांना प्रत्यक्ष अनेक कार्यक्रमात सहभाग घेता आले नाही. घरात पंचक्रोशी, मुंबई, पुणे, गोवा, बेळगाव आदी ठिकाणावरून नातेवाईक, पाहुणे आले होते. त्यातच घरी पाणी नसल्याने पाण्याचे सोय करणे महत्त्वाचे आहे. पाण्याविना अनेक काम रखडली. यामुळे गावातील अनेकानी वैयक्तिकरित्या खिशाला कात्री लावून टँकरने पाणी मागवले. पाणी हा समाजाचा किंबहुना माणसाचा मूलभूत हक्क आहे, परंतु तोच मूलभूत हक्क ग्रामपंचायतने हिरावून घेतला आहे. मुख्यतः पाणी वैयक्तिकरित्या टँकरने विकत घेतल्यामुळे, यावर्षीची पाणीपट्टी भरली जाणार नाही. आम्ही पाणी विकत घेतल्याचे बिल ग्रामपंचायतीला देतो... ग्रामपंचायतीने आम्हाला त्या बिलाचे पैसे द्यावे... अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून, पाण्याअभावी झालेल्या नाहक त्रासाला गावातील सरपंच आणि ग्रामपंचायत जबाबदार असल्याने गावकऱ्यांमधून नाराजीचा सूर आणि संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, गावात पाणी नसल्याची नकारात्मक चर्चा पंचक्रोशीत रंगत असून, पाणी नसताना कार्यक्रम कसा केला? असे पंचक्रोशीतील लोक विचारत आहेत. पाणी प्रश्नावर ग्रामपंचायत कोणता तोडगा काढणार? की पाणी प्रश्न वर्षानुवर्षे जसा 'आ' वासून उभा आहे, तसाच राहणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments