Type Here to Get Search Results !

चंदगडच्या काजूला जीआय मानांकनासाठी पुढाकार; जिल्हा परिषद कृषी समितीत आर्थिक तरतूद मंजूर


कोल्हापूर/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यातील प्रसिद्ध काजूला भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद कृषी समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. चंदगड पंचायत समितीचे सभापती विलास नाईक यांनी यासंदर्भात जोरदार मागणी मांडली.कोल्हापूर जिल्हा परिषद येथील वसंतराव नाईक सभागृहात पार पडलेल्या कृषी समिती बैठकीत चंदगडच्या काजूचे वैशिष्ट्य, गुणवत्ता व आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली ओळख लक्षात घेता त्याला जीआय मानांकन मिळणे गरजेचे असल्याचे सभापती विलास नाईक यांनी स्पष्ट केले.




या मागणीला कृषी समिती सभापती तानाजी पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत समितीतील सर्व सदस्यांच्या सहमतीने प्रस्तावास मंजुरी दिली. तसेच जीआय मानांकन प्रक्रियेसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.या निर्णयामुळे चंदगडच्या काजूला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, स्थानिक काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चंदगडच्या नैसर्गिक वातावरणात उत्पादित होणारा काजू चव, गुणवत्ता आणि टिकाऊपणामुळे विशेष प्रसिद्ध आहे.कृषी समितीच्या या निर्णयाचे चंदगड तालुक्यातील शेतकरी व काजू उत्पादकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments