चंदगड प्रतिनिधी ( रुपेश मऱ्यापगोळ ) : चंदगड शहरातील कोदाळी रोडवर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र बस स्थानक उभारण्यात यावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते धोंडिबा दळवी यांनी नगराध्यक्ष सुनील काणेकर व पंचायत समिती उपसभापती संज्योती मळविकर यांना निवेदन सादर केले.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या चंदगडमधील मुख्य बस स्थानकावरून कोल्हापूर व बेळगावकडे जाणाऱ्या बससेवा उपलब्ध आहेत. मात्र कोदाळी रोड परिसरात बस स्थानकाची सोय नसल्याने येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः प्रवाशांना बस पकडण्यासाठी लांब अंतर चालत जावे लागते तसेच उन्हात उभे राहण्याची वेळ येते.
हेर पंचायत गटातील नागरिकांसह कोदाळी रोड परिसरातील रहिवाशांना सोयीस्कर प्रवासासाठी या ठिकाणी स्वतंत्र बस स्थानक उभारण्यात यावे, अशी ठाम मागणी धोंडिबा दळवी यांनी केली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होऊन दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होईल, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.संबंधित प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments